मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांचा सवाल
धीरज परब
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान अजून भरून निघालेले नाही. व्यवसाय आता कुठे कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच परत लॉकडाऊन होणार असेल, तर कर्मचाऱ्यांना टिकवणे ही तर नंतरची गोष्ट, पण जिकडे आम्हीच तग धरू शकणार नाही, त्याचे काय, असा सवाल मीरा-भाईंदरमधील अनेक व्यापाऱ्यांनी केला आहे. मीरा-भाईंदरमधील एकूणच दुकानदार व विविध व्यापाऱ्यांच्या व्यवसाय आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आढावा घेतला असता अनेक चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. शहरात मोठ्या संख्येने दुकानदार, हॉटेल व अन्य व्यावसायिक हे भाड्याच्या जागेत आपला व्यवसाय करत आहेत. शहरातील भाडीही भरमसाट आहेत.
गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात भाड्यामुळे अनेकांनी आपले व्यवसाय बंद केले. तर, काहींनी कसाबसा तग धरला. कारण, बहुसंख्य मालकांनी भाडे अजिबात कमी केले नाही. काहींनी मात्र कमी केले तर काहींनी एखाद्या महिन्याचे भाडे माफही केले. मागील वर्षीच्या लॉकडाऊनकाळातच पगार देणे परवडत नसल्याने बहुसंख्य कर्मचारीवर्ग कमी करण्यात आला. लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर हळूहळू व्यवसाय पूर्वपदावर येईल, या आशेने व्यापारीवर्ग होता. पदरमोड करून काहींनी दुकानाचे भाडे भरले व कर्मचारीही टिकवले. परंतु, व्यवसाय हळूहळू का होईना पुन्हा उभा करू, अशी आशा व जिद्द बाळगून व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू ठेवला होता. पण, लॉकडाऊन सुरू झाल्याने आता मात्र सहनशीलतेच्या पलीकडे सर्व गेल्याच्या भावना व्यापारीवर्गात आहेत. कारण, नुकसान सहन तरी किती करायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावतोय. आपणच इतके अस्थिर झालेले आहोत, तर कर्मचाऱ्यांना कसे पोसायचे, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे. अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे त्यांच्याकडे काम करत असले तरी मागील लॉकडाऊनकाळात त्यांना शक्य तेवढा पगार देऊन टिकवून ठेवले होते. पण, पुन्हा लॉकडाऊन म्हणजे व्यवसायच बंद करण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे कृष्णा जेना याने सांगितले.
मालक किती महिने पगार देणार?
लॉकडाऊनची कळ व्यापारी काही महिने व काही वर्षे सोसतीलही. पण, कर्मचाऱ्यांनी कुठे जायचे? व्यवसायच बंद असेल तर मालक किती महिने पगार, पैसे देणार. शेवटी, आमच्या रोजगारावर संक्रांत आहेच, अशी व्यथा भावेश म्हात्रे या कर्मचाऱ्याने मांडली. लॉकडाऊन हा आता पर्याय राहिलेला नसून विनामास्क फिरणारे, गर्दी करणारे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर आणि सातत्याने कारवाईची गरज आहे. त्याशिवाय लोक सुधारणार नाहीत व कोरोनालाही आळा घालणे अशक्य असल्याचे सुरेश पाटील म्हणाले.