- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षाही जादा पाणीपुरवठा होऊनही शहरात समान पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना बुस्टर मोटरपंप लावल्याशिवाय पाणी मिळत नाही. परंतु, उल्हासनगर महापालिका त्यांच्यावर कारवाई का करीत नाही, हे एक कोडे निर्माण झाले आहे.
उल्हासनगर मनपाच्या हद्दीतून बारमाही उल्हास नदी वाहत असूनही पिण्याच्या पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसी दरदिवशी १४० एमएलडी पाणीपुरवठा शहराला करत असतानाही अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीकडून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने, शहराच्या अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाल्याची टीका होत आहे. बुस्टर मशीनशिवाय मुबलक पाणीपुरवठ्यासाठी ४०० कोटींची पाणीपुरवठा वितरण योजना काही वर्षांपूर्वी राबविण्यात आली. या योजने अंतर्गत मुख्य नवीन जलवाहिन्या, ११ उंच जलकुंभ, एक भूमिगत पाण्याची टाकी, पंपिंग स्टेशन व ५५ हजार पाण्याचे मीटर बसविण्यात आले. तरीही श्रीमंतांच्या परिसरात मुबलक पाणीपुरवठा, तर झोपडपट्टी भागात अर्धा तासाशिवाय पाणीपुरवठा होत नाही.
शहरात ८८ हजार नळजोडणी
शहरात १ लाख ७० हजार मालमत्ताधारक असताना घरगुती नळजोडणीची संख्या ८९ हजार, तर बिगर घरगुती नळजोडणी पाच हजारांपेक्षा जास्त आहेत. नळजोडणीचे सर्वेक्षण केल्यास नळजोडणी वाढण्याची शक्यता आहे.
शहराचा भूभाग उंच सखल असल्याने व झोपडपट्टींमधील जलवाहिन्या जुन्या, गळक्या झाल्याने, बुस्टर मशीनशिवाय नागरिकांना पाणी येत नाही. याबाबत कारवाई करणे महापालिकेच्या विचाराधीन आहे.
- जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त, उल्हासनगर मनपा
शहराला १४० एमएलडी पाणीपुरवठा
महापालिकेला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणीपुरवठा होत असूनही अनेक भागांत पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे १६० एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. परंतु, प्रत्यक्षात १३० एमएलडी पाणीपुरवठा शहराला मंजूर आहे.
--------
* ‘बुस्टर’शिवाय पाणी नाही
शहरात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा असल्याने नागरिकांना पाण्यासाठी बुस्टर मशीन लावावी लागते. त्यामुळे शहरांत घरोघरी ही मशीन आहे.
* दिवसाआड पाणीपुरवठा
लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त पाणीपुरवठा होऊनही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे.
-------
प्रतिक्रिया
उल्हासनगरला दरदिवशी १४० एमएलडी पाणीपुरवठा होऊनही झोपडपट्टी भागात पाणीटंचाई आहे, तर उच्चभ्रू भागात पाणीटंचाई का नाही, असा प्रश्न महापालिकेला आहे.
- शिवाजी रगडे, रहिवासी
--------