अश्विनी भाटवडेकर, ठाणेदहशतवाद आणि गुंडगिरी संपविण्याची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असले तरी त्यांच्या भारतीय जनता पार्टीने कल्याण - डोंबिवली मनपा निवडणुकीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या २१ जणांना उमेदवारी दिली असून शिवसेनेने २३ नामचीन व्यक्तींना रिंगणात उतरवले आहे. सुशिक्षितांचे शहर अशी ओळख असलेल्या या शहरातील महापालिका निवडणुकीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले ९५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एडीआरच्या (असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स) अहवालानुसार, एकूण ७४१ उमेदवारांपैकी १२१ जणांवर गुन्हे दाखल असून त्यातील ९५ जणांविरोधात गंभीर गुन्हे आहेत. सर्व प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना रिंगणात उतरवण्यात भाजपा यात आघाडीवर आहे. भाजपाच्या एकूण १०८ उमेदवारांपैकी २८ जणांवर गुन्हे तर २१ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. भाजपाखालोखाल अपक्षांचा नंबर लागतो. त्यांच्या एकूण २४९ उमेदवारांपैकी २७ जणांविरोधात साधे तर २२ जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. आपणच सत्तेत येणार असा दावा करणाऱ्या शिवसेनेच्या ११४ पैकी २६ उमेदवारांवर साधे तर २३ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.कल्याण - डोंबिवली मनपा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी, आश्वासनांची खैरात सुरूच आहे. पण, आपलं भवितव्य ५ वर्षांसाठी ज्याच्या हातात द्यायचं, ते आपले होऊ घातलेले लोकप्रतिनिधी त्यासाठी सक्षम आहेत की नाही, याची माहिती मतदारांना असायलाच हवी. मात्र, या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता ‘अच्छे दिन’ आणायचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांवर सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत.
कसे येणार ‘अच्छे दिन’?
By admin | Published: October 28, 2015 11:19 PM