- नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडीतआगी लागण्याचे सत्र सुरुच असून तालुक्यातील सरवली एमआयडीसी परीसरात असलेल्या कपिल रेयॉन इंडिया प्रा लि या डाईंग कंपनीस गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे. दोन मजली असलेली ही संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहे. या कंपनीत कच्च्या कपड्याचा व पक्क्या कपड्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात आला होता तसेच मोठ्या प्रमाणात धागा देखील साठवून ठेवण्यात आला होता.
या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कल्याण, ठाणे व एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांची मदत देखील मागवण्यात आली आहे. कंपनीला लागलेल्या या आगीमुळे परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट उडत असून अजूनही आगीवर नियंत्रण मिळाले नसल्याने हि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास या कंपनीत आग लागली त्या वेळी या कंपनीत सुमारे ३० ते ४० होते. मात्र कामगारांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. एकीकडे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत मात्र याठिकाणी पाण्याची कमतरता भासत असल्याने अग्निशमन दलाला पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझवतांना मोठी अडचण निर्माण होत आहे. दुसरीकडे कंपनीच्या दोन्ही मजल्यावर आग लागल्याने या आगीत कंपनी पूर्णतः जळून खाक झाली आहे . त्यामुळे कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून या आगीचे नेमकी कारण अजून समजले नाही.
मात्र वर्षाअखेर व मार्च महिना अखेर भिवंडीत डाइंग , सायजिंग , यंत्रमाग कारखाने , गोदाम , तसेच केमिकल गोदाम यांना आगी लागण्याचे सत्र नेहमीच सुरु होते. त्यामुळे या आगी लागतात की लावल्या जातात याचा अजूनही तपास पोलीस यंत्रणेला लागलेला पाहायला मिळत नाही. मात्र वारंवार लागत असलेल्या या आगिंमुळे भविष्यात भिवंडीत भोपाळ सारखी घटना घडू नये यासाठी यंत्रणांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.