भिवंडी - दोन दिवसापूर्वी झोपडीला लागलेल्या आगीत होरपळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना भिवंडी शहरात पुन्हा अग्निकांड पाहायला मिळाले असून भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड परिसरात मेन कार्पोरेशन नावाच्या यंत्रमाग कारखान्याला शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास भिषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या कारखान्यालागत असलेला आसपासचा परिसर रहीवाशी असल्या कारणाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.लागलेल्या या आगीमुळे कारखान्याचे पत्रे फुटत असल्या कारणाने आसपासच्या नागरिकांनी आपल्या घरातील सिलेंडर बाहेर काढून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. कारखान्यात मोठ्या प्रमाणात कापडांचा साठा तसेच धाग्याचे कोम साठवून ठेवण्यात आलं होतं. अचानक लागलेल्या या आगीत संपूर्ण यंत्रमाग कारखाना जळून खाक झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे . मनसुख जाखरिया असे आग लागलेल्या कारखाना मालकाचे नाव असून या आगीचे लोळ भिवंडी शहरातुन दूरवर पर्यंत दिसत होते.आग लागण्याचे कारण काय आहे ते अजूनही समजू शकले नसले तरी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या व अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत दोन तासाने या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले असून सुदैवाने जिवीत हानी टळली आहे.
भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग संपूर्ण कारखाना जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 3:12 PM