बोईसर : तारापूर एमआयडीसीतील ‘एन’ झोनमधील वॉलपेपरच्या गोदामाला मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली. तारापूर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांकडून रात्रीपर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.
गोदामाला लागलेली आग ऑक्टो इंटरियल कारखान्यात पसरल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आग पसरत असल्यामुळे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प व पालघर नगर परिषदेच्याही गाड्या मदतीसाठी मागविण्यात आल्या.
ज्वलनशील फायबर शीटमुळे भडका?आगीचे कारण समोर आले नसून ज्वलनशील फायबर शीटसारख्या वस्तूंचा साठा असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे, तर तारापूर औद्योगिक क्षेत्रात नेहमीच होणाऱ्या आग व स्फोटांच्या घटनांमुळे कामगारांची सुरक्षा ऐरणीवर आली असून कामगारांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.