भिवंडी : भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायत हद्दीतील नदीनाका मिठपाडा ते खोणी या रस्त्यावर काँक्रीट रस्त्यांचे काम मागील एक वर्षांपूर्वी केले. या रस्त्यावर ठेकेदाराकडून काम करताना अनेक ठिकाणी काम अर्धवट सोडल्याने बऱ्याच ठिकाणी वाहनचालकांना काँक्रिट रस्त्याचे टप्पे सांभाळीत वाहन चालवावे लागत आहे.
काहीच महिन्यांतच या मार्गावर खड्डे पडले असून हा रस्ता उखडला आहे. कोट्यवधींचा खर्च करूनही ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे रस्त्याचे काम अपूर्ण असून काही दिवसांतच गणपतींचे या खड्ड्यांतूनच आगमन होणार आहे. एक कोटीहून अधिक रुपये खर्च करून हा रस्ता तयार करताना फक्त पाच इंच काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. नदीनाका पारोळ रोडवरील नदीनाका मिठपाडा ते खोणीपर्यंत अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर काँक्रीट रस्ता बनवित असताना त्याखालील मजबुतीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणास भेगा तर काही ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत.