'हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!' अंबरनाथमध्ये काँग्रेसने पाण्यासाठी रक्तदान करीत काढला मोर्चा
By पंकज पाटील | Published: April 28, 2023 06:07 PM2023-04-28T18:07:13+5:302023-04-28T18:07:31+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची भेट घेत काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले. तसेच जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रक्तदान केलेले प्रमाणपत्र भेट देऊन त्यांचा निषेध व्यक्त केला.
अंबरनाथ : अंबरनाथमधील पाणी समस्येविरोधात काँग्रेसने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर मोर्चा काढला आहे. सोबतच 'हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!' असे म्हणत पाण्यासाठी काँग्रेसने रक्तदान सुद्धा केले. यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची भेट घेत काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले. तसेच जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रक्तदान केलेले प्रमाणपत्र भेट देऊन त्यांचा निषेध व्यक्त केला.
अंबरनाथ शहराच्या काही भागात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. याबाबत अनेक वेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तक्रारी करूनही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे अखेर 'हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!' अशी घोषणा देत काँग्रेसने थेट रक्तदान करण्यास सुरुवात केली. उपस्थित नागरिकांनीही यावेळी रक्तदान करत पाण्याची मागणी केली. रक्तदान केल्यानंतर नागरिकांनी जीवन प्राधिकरणावर पाहण्यासाठी मोर्चा काढला. अंबरनाथ पश्चिमेच्या इंदिरा भवन ते पूर्वेतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो महिला आणि काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी मिलिंद बसनगार यांची भेट घेत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांना पाण्यासाठी चांगलंच धारेवर धरले. मोर्चा निघणार असल्यामुळे आज वेळेवर पाणी सोडले, मग इतके दिवस पाणी का येत नाही? असा जाब काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी विचारला. त्यावर यापुढे दर एक दिवसाआड दोन तास पाणी देण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र एक दिवसाआड नको, तर दररोज किमान १ तास पाणी देण्याची मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली. ही मागणी मान्य करत पाणीपुरवठा करण्याचर आश्वासन यावेळी देण्यात आल्याची माहिती काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी दिली.
एसी बंद आहे, गर्दी कमी करा :
काँग्रेसचा मोर्चा जीवन प्राधिकरणावर आल्यानंतर शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांच्या दालनात त्यांच्यासोबत चर्चेसाठी कार्यालयात प्रवेश करताच संबंधित विभागाचे अधिकारी यांनी ' एसी बंद आहे, गर्दी कमी करा' असा सल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना देताच काँग्रेसचे नगरसेवक संबंधित अधिकाऱ्यावर चांगलेच भडकले. मोर्चातील नागरिक उन्हात असताना तुम्हाला एसीची हवा हवी आहे का असे म्हणत अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.