सुरेश लोखंडेठाणे : शहरास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्य जीव, प्राणी, पशू पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. या प्राण्यांच्या पाण्यासाठी जंगलात बांधलेल्या हुमायून बंधाºयास गळती लागली आहे. त्यातील पाणी उन्हाळ्यात प्राण्यांना मिळत नाही. यावर मात करण्यासाठी त्याची डागडुजी करण्याचे काम वनविभाग हाती घेण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, या जंगलातील इतरही पाणीस्रोतांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे वन्यप्रेमींचे मत आहे.
येऊरच्या जंगलात हरीण, बिबटे, काळवीट, माकड, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांप्रमाणेच दुर्मीळ जातींच्या पक्ष्यांचा मुक्तसंचार आहे. त्यांच्या पाण्यासाठी पाणवठ्यांच्या जवळपास बंधारेही येऊरमध्ये आहेत. पण, त्यांना गळती लागल्यामुळे त्यातील पाणी पावसाळ्याच्या काही कालावधीतच संपलेले असते. यापैकी हुमायून बंधारा हा एक आहे. येऊरमधील वायुसेना दलाच्या केंद्राजवळ हा बंधारा आहे. त्याची डागडुजी केल्यास त्यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा तयार होईल आणि प्राण्यांनाही त्याचा वापर होईल. यासाठी त्याची डागडुजी करण्यासाठी वायुसेना दलाच्या कार्यालयाची सहमती घेण्याकरिता वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहे.
येऊरमध्ये बांधलेल्या या हुमायून बंधाºयास बरीच वर्षे झाली आहेत. या बंधाºयातील पाणी खाली सोडता यावे, याकरिता तीन दरवाजेदेखील या बंधाºयास आहेत. मात्र, त्यांचे लोखंडी फाळके अस्तित्वात नाही, त्यांची फ्रेमही जीर्ण झाली आहे. याशिवाय, बांधकामातून पाण्याचे फवारे उडत आहेत. या बंधाºयात गाळ साचलेला असल्यामुळे त्यात आवश्यक पाणीसाठा होत नाही. यामुळे या बंधाºया खाली असलेल्या पाणवठ्यांमध्येदेखील पाणी साचलेले नसल्यामुळे उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी जंगलभर भटकंती करावी लागते. यावर मात करण्यासाठी वनखात्याने येऊरच्या जंगलातील हुमायूनसह अन्यही ठिकठिकाणचे बंधारे, पाणवठ्यांची डागडुजी करून पाण्याचे स्रोत मोकळे करण्याचे काम हाती घेतले आहे.हे पाणीस्रोतही मजबूत करण्याची गरजयेऊरमधील या हुमायून बंधाºयानंतर चिखलाचे पाणी, कोंजरीचा पाणवठा, पटेलक्वारी, चेणा नदीजवळ ओवळा परिसरात चांभारखोंडा, टाकाचानाला, आंब्याचे पाणी, तर नागलाबंदरच्या सारजामोरी परिसरात तलावलीचा पाणवठा, तर ससूनवघर येथील करलेचे पाणी, कोरलाईचा व करंदीचा पाणवठा या घोडबंदर परिसरातील पाणवठ्यांचे पाणीस्रोत मजबूत करण्याची गरज आहे.