कल्याण : केडीएमसीच्या हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने सोमवारी महापालिका मुख्यालयावर बिºहाड मोर्चा काढला. याप्रसंगी आदिवासींंनी महापालिकेविरोधात घोषणा दिल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली. रामभाऊ वारणा, बाळाराम भोईर, राजेश चन्ने, विष्णू वाघे, गणेश भामरे, कमळाबाई तरणे, नंदू जाधव, भालचंद्र वाघमारे, शांताराम राऊत, विलास चौधरी, वासुदेव वाघे, प्रकाश खोडका, बाळू हुमणे आदी या मोर्चात सहभागी झाले होते. महापालिकेच्या स्थापनेच्या आधीपासून पालिका हद्दीत २५ आदिवासीपाडे आहेत. मात्र, ते सुविधांपासून दूर आहेत. लामणीपाडा, आधारवाडी, वाडेघर या पाड्यांना दूषित पाणीपुरवठा होत आहे.सरकारने कायदा करून शिक्षणाची सक्ती केली आहे. मात्र, आदिवासीपाड्यांतील मुलांना अद्याप शिक्षणासाठी सुविधाच उपलब्ध नाहीत. बिल्डरांनी आदिवासींच्या जमिनींवर कब्जा करून त्यांना तेथून हुसकावून लावले आहे. यासंदर्भातील विविध मागण्यांसाठी मोर्चातील शिष्टमंडळाने केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. यापूर्वी काढलेल्या मोर्चावेळी प्रशासनाने आदिवासींना आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पाळले न गेल्यामुळे मोर्चा काढण्यात आला.१५ दिवसांत समस्या सोडवण्याचे आश्वासन : शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी आदिवासींच्या समस्यांबाबत चर्चा केली. त्यावर १५ दिवसांत सर्व आदिवासीपाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊ न समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, १५ दिवसांनंतरही या समस्या सोडवण्यात दिरंगाई झाल्यास आदिवासी आंदोलन करतील, असा इशारा संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिला.
श्रमजीवीचा बि-हाड मोर्चा :आदिवासींचा केडीएमसीवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 2:42 AM