लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शनिवार रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने उल्हास व वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. परिणामी नदीच्या पुराचे पाणी शेकडो घरात घुसले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिका अनेक कुटुंबांना शाळा, समाजमंदिर आदी ठिकाणी हलवीत असल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. तर शहरातील अनेक सखल भागातही पाणी साचल्याने परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे.
रविवारी रात्री कॅम्प नं-४ भारतनगरमधील अनेकांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू खराब झाल्या. अग्निशमन दलाने पाणी निचऱ्याची व्यवस्था करून नागरिकांना मदत केली. सोमवारी दुपारनंतर कॅम्प नं-३ येथील शांतीनगर परिसरातील गाऊबाई नगरातील अनेकांच्या घरात वालधुनी नदीच्या पुराचे पाणी घुसले असून त्यांच्या राहण्यासाठी महापालिका पर्यायी व्यवस्था करीत आहे. तसेच पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना जेवणासह इतर सुविधा पुरविण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
उल्हास नदीने धोक्याची पातळी गाठल्याने, शहाड गावठण, म्हारळ गाव रस्त्याकडील रिजेन्सी, ठारवाणी गृहसंकुलासह म्हारळ गाव, नाका, चौकासह शहरातील सखल भागात नदीच्या पुराचे पाणी घुसल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच उल्हासनगर ते मुरबाड रस्त्यावर नदीच्या पुराचे पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. नदी किनाऱ्यावरील म्हारळ, वरप, कांबा गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आश्वासन स्थानिक प्रशासनासह शासनाने केले आहे. शहरातील मयूरी हॉटेल, गोल मैदान, महापालिकेकडे जाणाऱ्या स्टेट बँकसमोरील रस्ता अशा अनेक भागात पाणी साचून शहराला तलावाचे स्वरूप आले होते. उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी पुलावरून रविवारपासून पुराचे पाणी जात असून पुलावरून वाहतूक बंद केली आहे.
------------
महापुराच्या आठवणी जागविल्या
२००६ साली आलेल्या महापुराचा वालधुनी व उल्हास नदीकिनाऱ्यावरील शेकडो नागरिकांना फटका बसून अनेकांचा मृत्यू झाला होता. गेल्या दोन दिवसासून संततधार पाऊस सुरू असल्याने, महापुराच्या भीतीने अंगावर शहारे उभे राहिले. मात्र महापालिकेने सर्व उपाययोजना केली असून आपत्कालीन पथके तैनात केली असल्याची आम्ही उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
--------------------