ठाणे : भाजपच्या सत्ता काळात इंधन दरवाढीचा आलेख चढाच राहिला आहे. मे महिन्यामध्ये सुमारे १४ वेळा इंधनाचे दर वाढले आहेत. आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे फलक संपूर्ण ठाणे शहरात लावून अच्छे दिनच्या शुभेच्छा देऊन मोदी सरकारला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देऊन अनोखा निषेध केला.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये या महिन्यातील ४ तारखेनंतर शुक्रवारी चौदावी दरवाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ठाणे- मुंबईत पेट्रोलने शंभरी गाठली आहे. डिझेलची किंमत २९ पैसे प्रतिलीटरने वाढली आहे. ठाणे- मुंबईत शुक्रवारी पेट्रोल १००.४ रुपये आणि डिझेल ९१.८७ रुपये प्रतिलीटर आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे फलक लावले. त्यावर दाढीवाल्या फलंदाजाचे चित्र असून, त्याने शतक पूर्ण केल्याचे नमूद केले आहे. “मॅन ऑफ दि मॅच, पेट्रोल १०० नॉट आऊट; अच्छे दिनच्या शुभेच्छा” असा संदेश लिहिला आहे. या फलकांची ठाणे शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, गेले काही दिवस सातत्याने इंधनाचे दर वाढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने या दरवाढीचा निषेध करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे फलक लावले आहेत. त्यावर एका बॅट्समनचे चित्र असून, त्याला आम्ही मॅन ऑफ दि मॅचचा पुरस्कार देऊन शंभरी पार केल्याबद्दल अच्छे दिनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते “बहुत हुई महँगाई की मार, अब की बार मोदी सरकार” असे ओरडत होते. मात्र, आता त्यांच्या कार्यकाळात महागाईने उच्चांक गाठला आहे. यूपीएच्या काळात पेट्रोल-डिझेल एवढे कधीच महाग झाले नव्हते. त्यामुळेच केंद्रातील मोदी सरकारच्या निषेधासाठी हे फलक लावले आहेत.