- सुरेश लोखंडेठाणे : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये शिधावाटप दुकानांवर गहू, तांदूळ व तूरडाळ मिळत असे. सद्य:स्थितीला जिल्ह्यातील या शिधावाटप दुकानांवर शेकडो क्विंटल तूरडाळ पडून आहे. या डाळींचे वितरण होत नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील कार्डधारकांकडून ऐकायला मिळत आहेत. दुकानांमधील या तूरडाळीचे वितरण थांबवल्यामुळे कार्डधारकांत संताप व्यक्त होत आहे.ज्यांनी सहा महिन्यांपासून रेशनिंगवरील धान्य घेतलेले नसेल, त्यांचे कार्ड कायमचे बंद करण्यात येत असल्याची चर्चा आधीच सुरू आहे. जिल्ह्यातील एक लाख ४९ हजार २०० पेक्षा अधिक कार्डधारकांची नावे कायमची वगळण्यात येणार आहेत. यात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब यादीतील कार्डधारकांची नावे आहेत. या कारवाईतून बचाव करण्यासाठी बहुतांश कार्डधारक गहू, तांदूळसह तूरडाळ घेण्यासाठी दुकानांवर धाव घेत आहेत. मात्र, त्यांना दुकानात उपलब्ध असलेली तूरडाळ सवलतीच्या दरातही मिळत नसल्यामुळे त्यांच्यात संताप व्यक्त केला जात आहे.हे लाभार्थी घेतात लाभजिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब यादीतील ७,४४,४७७ कार्डधारकांपैकी ५,९६,७७५ कार्डधारक दरमहा अन्नधान्य खरेदी करतात. या कार्डधारकांपैकी अंत्योदय योजनेचे शहरी भागात १३, १३० लाभार्थी आहेत. यांपैकी जिल्ह्याभरातील ११,६२६ कार्डधारक अन्नधान्याचा लाभ घेत आहेत.कोरोनाकाळात पुरवठाजिल्ह्यातील शहरी भागात ७,५७,६०० कार्डधारकांची नोंद आहे. यांपैकी ६,०८,४०१ कुटुंबांकडून दरमहा या स्वस्त धान्य दुकानांतील किराणा घेतला जात आहे. मात्र, कोरोनाकाळात हजारो कार्डधारकांना मोफत, तर कार्ड नसलेल्या गरजूंना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात आले. त्यासाठी दरमहा दहा हजार ९१७ मेट्रिक टन अन्नधान्याचा मागणीनुसार पुरवठा करण्यात आला होता. कोरोनाच्या कालावधीत वाटपासाठी उपलब्ध झालेली तूरडाळ शिधावाटप दुकानांवर आजही आहे; पण या डाळीला वाटप करण्याची परवानगी नसल्यामुळे तिचे वितरण करण्याचे थांबवले आहे. शासनपातळीवर त्यावर लवकरच निर्णय होईल. त्यानुसार कारवाई करता येईल.- नरेश वंजारी, उपनियंत्रक, शिधावाटप, ‘फ’ परिमंडळ, ठाणे
शेकडो क्विंटल तूरडाळ पडून; वाटप न केल्याने जिल्ह्यातील कार्डधारकांमध्ये तीव्र संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 1:16 AM