ठाणे : जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात वास्तव्याला असलेल्या टकारी समाजाचे कार्यकर्ते आझाद मैदानावर सोमवारी १८ जानेवारीपासून सुरू होणार्या बेमुदत अमरण उपोषणात सहभागी होणार आहे. टकारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र टकारी संघाच्या या उपोषणात जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्यासंख्येन सहभागी होणार असल्याचे सुतोवाच अंबरनाथ येथील टकारी समाज संघाचे जेष्ठा पदाधिकारी रमेश जाधव यांनी लोकमतला सांगितले.
टकारी हा समाज दगडी जात्याला टाकी देण्याचा पारंपरिक व्यवसाय करणारा एक अतिप्राचीन जमात आहे. टकारी ही राज्यातील पारधी जमातीची एक पोटजमात आहे. पारधी जमातीमधील दगडी जात्याला टाकी देण्याचा पारंपरिक व्यवसाय करणाच्या जमातींना टकारी, टाकणकर किंवा टाकिया या तीन नावाने ओळखण्यात येते. इ. स. १८८१ पासून टकारी जमातीचे वर्गीकरण पारधी जमातीमधील टाकणकर या जमातीबरोबर संयोजित केल्याचा दावा केला जात आहे.
शासकीय अहवाल, जनगणना अहवाल समाजाकडून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, आदिवासी विभाग मंत्रालयाला सादर केले आहेत. या अहवालाच्या अनुषंगाने शासनाने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आझाद मैदानावर बेमुदत अमरण उपोषण आयोजीत केले आहे. या समाजाचा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने अद्यापही मागणीस अनुसरुन अहवाल शासनाला सादर केलेला नसल्याचा आरोप केला जात आहे. त्याविरोधात राज्य टकारी समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष नामदेव जाधव व राज्य संघटक संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडल्याचे रमेश जाधव यांनी स्पष्ट केले आहे.