ठाणे - सभागृहात वाघ आणि कुत्रा असा उल्लेख करत लोकप्रतिनिधीना अप्रत्यक्षपणे चिमटे काढणाऱ्या पालिका आयुक्तांना राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. सभागृहात वाघ आपली हद्द सोडून गेला की, त्या ठिकाणचा ताबा घेण्यासाठी अनेक जण सरसावतात असा उल्ल्लेख सभागृहात झाला असल्याचे मी ऐकले. मात्र वाघ जेव्हा हद्द सोडून शहरात येतो तेव्हा तो नरभक्षक होतो, अशा वाघाची शिकार करावी लागते असा उपरोधिक टोला परांजपे यांनी लगावला आहे. परांजपे यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहातील वादळ आता बाहेर देखील आले असून यानिमित्ताने आरोप प्रत्यारोप अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या सुरु वातीलाच भाजपा आणि पालिका आयुक्त असा वाद रंगला होता. महासभेची प्रश्नोत्तरे पालिका आयुक्तांच्या दालनात काही दिवसांपूर्वी घेतली असल्याने या सुनावणीची सीडी आपल्याला उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी सभागृहात केली होती. यावरून पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निवेदन करताना वयक्तीक टीका न करण्याचे आवाहन करत लोकप्रतिनिधीना या मुद्द्यावरून अनेक चिमटे काढले. एकदा कुत्रा चावला की प्रत्येक कुत्रा आपल्याला चावणार अशी भीती मनात बसते. त्यामुळे माझ्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यामुळेच नगरसेवकांना दिलेल्या सुनावणीचे चित्रिकरण केल्याचा उल्लेख आयुक्तांनी केला. मात्र, शब्दश: अर्थ कुणी न घेतल्याने वादंग टळला. त्यानंतर वाघ जेव्हा आपली हद्द सोडत असतो तेव्हा त्यावर कब्जा करण्यासाठी अनेक जण सरसावत असतात. लवकरच माझी बदली होणार असल्याने तसे प्रयत्न तर होत नाहीत ना, असे टोकाचा ल्लेखही आयुक्तांनी केला. त्यातही भाजपाच्या नगरसेवकांना मुख्यमंत्री लगेच भेट देतात, परंतु माझा चेहरासुध्दा मुख्यमंत्र्यांच्या लक्षात नसेल असा चिमटाही त्यांनी काढला होता. लोकप्रतिनिधीना दिलेल्या या चिमट्यांचा राष्ट्रावादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी चांगलंच समाचार मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये घेतला.शहराचा विकास हा करदात्यांच्या पैशातून होतो असा उल्लेख करत बैलगाडीच्या खालून चालणाऱ्या कुत्र्याला असे वाटते की आपण बैलगाडी खेचतो आहे. मात्र हा त्याचा केवळ भ्रम असल्याचे परांजपे यांनी सांगितले. सोमवारी झालेल्या सभागृहात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कुत्रा आणि वाघ असा उल्लेख करूनही लोकप्रतिनिधीनी मात्र यावर कोणत्याही प्रकारचा वादंग न करता पालिका आयुक्तांच्या या वक्तव्यांना बगल दिली असली तरी, परांजपे यांच्या या प्रत्युत्तरामुळे मात्र आता सभागृहाच्या बाहेर चांगलाच वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
नरभक्षक वाघाची शिकार करावीच लागते, आयुक्तांच्या सभागृहातील चिमट्यावर आनंद परांजपे यांचे प्रतिउत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 4:34 PM
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेत काढलेल्या चिमट्यांचा चांगलाच समाचार राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी घेतला आहे. वेळ आल्यावर नर भक्षक वाघाची शिकार करावीच लागते असा टोला त्यांनी लगावला आहे.
ठळक मुद्देमहासभेत आयुक्तांनी काढले होते शाब्दीक चिमटेसभागृहातील वातावरण आता बाहेरही तापणार