कल्याण : तौक्ते वादळाचा फटका शेतीमालासही बसला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) मंगळवारी ४० टक्के कमी शेतीमालाची आवक झाली. त्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतीमाल विकण्यास व्यापाऱ्यांना अडचणी आल्या. त्यामुळे फारसा मालही विकला गेला नाही.
एपीएमसीत सोमवारी तीन हजार २५४ क्विंटल फळे आणि भाजीपाला आला होता. सोमवारी आलेल्या वादळामुळे मंगळवारी पहाटे बाजारात केवळ एक हजार २३४ क्विंटल फळे आणि भाजीपाला आला. एपीएमसीत पुणे, जुन्नर, नाशिक तसेच गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून शेतीमाल येतो. वादळामुळे शेतीमालाची वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो मंगळवारी पहाटेपर्यंत कल्याणमध्ये पोहोचू शकले नाहीत. कांदा, बटाट्याची वाहतूक करणारे टेम्पो, ट्रक सोमवारी गुजरात आणि राजस्थानमधून आले होते. मात्र, मंगळवारी वादळामुळे शेतीमालाची आवक झाली नाही. फळे, भाजीपाल्याप्रमाणेच कांद्याची ९६० क्विंटल, बटाट्याची एक हजार ६३५ क्विंटल, तर अन्नधान्याची एक हजार ६६० क्विंटल आवक झाली आहे. तसेच सोमवारी कांद्याची दोन हजार ६५८ क्विंटल, बटाट्याची एक हजार ३६० आणि अन्नधान्याची ९७४ क्विंटल आवक झाली होती.
कोरोनाकाळात केवळ अत्यावश्यक बाब म्हणून कल्याण एपीएमसीतील बाजार सुरू आहे. केवळ ५० टक्के क्षमतेनेच गाळे सुरू ठेवून बाजार चालविला जातो. तसेच दर रविवारी एपीएमसी बंद ठेवली जाते. कोरोनामुळे बाजारातील व्यापाऱ्यांना फटका सहन करावा लागत असताना, आता ‘तौक्ते’चाही फटका बाजार समितीला सहन करावा लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
-------
तौक्ते वादळी वाऱ्याचा फटका बाजार समितीला बसला आहे. बाजार समितीत शेतीमालाची आवक ४० टक्के कमी झाली आहे. त्यात बाजार समितीचा वीजपुरवठा खंडित असल्याने व्यापाऱ्यांना व्यापार करता आलेला नाही. फार कमी प्रमाणात मालाला उठाव होता.
- श्यामकांत चौधरी,
सचिव, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती
----------------------