ठाणे : मिरगीचा आजार असलेल्या शारदा शुक्ला (५५, रा. रूपादेवीपाडा, इंदिरानगर, ठाणे) हिचा संपत्तीच्या वादातून दोरीने गळा आवळून खून करणारा पती सोमनाथ राजेश्वर शुक्ला (६५) याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने रविवारी दिले. खुनानंतर पत्नीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचा बनाव त्याने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि श्रीनगर पोलिसांकडे केला होता.सोमनाथ शुक्ला (६५) हा शारदाचा दुसरा पती आहे. पहिल्या पतीच्या निधनानंतर १५ वर्षांपूर्वी तिने सोमनाथबरोबर लग्न केले होते. पहिल्या पतीपासून तिला दोन मुले होती. आपल्या मुलांना सोमनाथने आपल्या वाट्याला येणाऱ्या घरांपैकी एक घर द्यावे, तर दुसरे घर हे त्या दोघांच्या मुलाला द्यावे, अशी तिची इच्छा होती. त्याने तिच्या मुलांच्या नावावर घर करण्यास विरोध केला होता. यातूनच गेले काही दिवस त्यांच्यात वाद सुरू होता. त्यामुळेच त्याने ८ नोव्हेंबर रोजी रात्री रस्सीने गळा आवळून तिचा खून केला. मिरगीने चक्कर आल्याने पडून तिचा मृत्यू झाल्याचा बनाव त्याने केला. शवविच्छेदनानंतर हा प्रकार उघड झाला.
पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 5:23 AM