ठाणे: पत्नी भावना अमित बागडी (२४), सहा वर्षीय मुलगी खुशी आणि आठ वर्षीय मुलगा अंकुश या तिघांची लाकडी बॅटच्या सहाय्याने निर्घृण हत्या करणाऱ्या अमित धर्मवीर बागडी (२९) या पतीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने हरियाणातील इसारमधून अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शनिवारी दिली. लग्नाच्या तिसऱ्या वर्षांपासून ती ठाण्यातील दिराकडे वास्तव्याला होती. शिवाय, आपल्याला तुच्छतेची वागणूक देत होती, याच कारणातून तिची मुलांसह हत्या केल्याची कबूली अमितने पोलिसांना दिली.
कासारवडवलीमध्ये २१ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या या तिहेरी हत्याकांडामुळे ठाणे शहरात एकच खळबळ उडाली होती. हत्येनंतर थेट हरयाणामध्ये पळालेल्या अमितच्या शोधासाठी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले आणि उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट- ५, खंडणी विरोधी पथक, मालमत्ता कक्ष आणि मध्यवर्ती कक्ष यांच्याकडील आठ पथके तयार करुन त्यांना वेगवेगळया ठिकाणी पाठविले होते. तिहेरी हत्याकांडानंतर तो उरणमध्ये मावशीकडे गेला. तिथून निघतांना चप्पल ऐवजी बूट घालून उलवे आणि नंतर नेरुळला पोहचला. नेरुळवरुन तो छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या लोकलमध्ये बसल्याचे सीसीटीव्ही फूटेज तपास पथकाला मिळाले. त्याच आधारे हरियाणामध्ये त्याच्या शोधासाठी अन्य एक पथक गेले. युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके, सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, अविनाश महाजन, उपनिरीक्षक तुषार माने आणि सुनिल अहिरे आदींच्या पथकाने त्याला हरियाणातील हिस्सार येथून मोठया कौशल्याने २२ डिसेंबर रोजी रात्री ताब्यात घेतले.
प्रेमविवाह होऊनही वास्तव्य मात्र दिराकडे....आठ वर्षांपूर्वी लग्न झाले. दोन मुलेही झाली. लग्नाच्या तीन वर्षांनी पत्नी हरयाणातून ठाण्यात दीराकडे (अमितचा सख्खा लहान भाऊ विकास) कासारवडवलीमध्ये वास्तव्याला आली होती. गेल्या पाच वर्षांपासून ती त्याच्यासोबत रहात होती. पाच वर्षांमध्ये अमित कधीतरी मुलांना भेटण्याच्या निमित्ताने यायचा. पण त्यांच्यात भांडणे व्हायची. त्याच्या दारुच्या व्यसनामुळे ती मुलांनाही त्याला भेटू देत नव्हती. ‘तुम कुत्ते की औलाद हो’ असे म्हणत त्याला हिणवायची. ती कामासाठी बाहेर जायची. त्याला कामही नव्हते. २१ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भाऊ विकास हाऊसकिपिंगच्या कामासाठी घराबाहेर पडल्यानंतर तो तिच्याजवळ गेला. त्यावेळी त्यांच्यात असाच वाद झाला. त्यावेळी क्षणिक रागातून आपण हे कृत्य केल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली. आदल्या दिवशी मुलाचा वाढदिवस केला साजरा...या हत्याकांडाच्या आदल्या दिवशी २० डिसेंबर रोजी त्याचा मुलगा अंकुश याचा वाढदिवस होता. तो अमितसह संपूर्ण कुटूंबाने घरगुती पद्धतीने साजराही केला. आदल्या दिवशी आनंदात असलेल्या अंकुशसह तिघांची त्याच्याच पित्याने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी बॅटने निर्घृण हत्या केली. झाल्या प्रकाराचा कोणताही पश्चाताप नसल्याचेही अमितच्या चेहऱ्यावर दिसत असल्याचे तपास पथकाने सांगितले.