ठाणे : ठाण्यात कर्नाटक राज्यातून कामासाठी आलेली पत्नी शोभा अशोक हरिजन (४०) हिला जबरदस्तीने नेण्यासाठी पती अशोक हरिजन (४५) आला होता. त्याला विरोध केल्याने पत्नी आणि तिचा मामा दुनड्डाप्पा कट्टीमणी यांच्यावर विळ्याने वार करून कर्नाटकात तो पसार झाला होता. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी तीन महिन्यांनी त्याला शनिवारी अटक केली.शोभा तिचा मामा दुनड्डाप्पा हे ५ फेब्रुवारी २०१९ रोजी ठाण्यातील घोडबंदर रोडवरील तुर्फेपाडा प्लॅटिनम इमारतीच्या साइटवर मजुरीचे काम करत होते. ते साइटवरील लेबर कॅम्प येथील घरी असताना शोभाचा पती अशोक तिथे आला. तो तिला जबरदस्तीने गावी घेऊन जात होता. पतीकडून होणाºया त्रासामुळे तिने पुन्हा त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला. मामा दुनड्डाप्पा यांनीही तिला पुन्हा घेऊन जाण्यासाठी विरोध दर्शवला. याचाच राग आल्याने अशोकने घराजवळील झाडाच्या बाजूला असलेले ऊस तोडण्याचे धारदार हत्यार घेऊन मामा दुनड्डाप्पा याच्या मानेवर, तसेच शोभाच्या डोक्यावर आणि दोन्ही हातांच्या पंजांवर वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर पसार झालेल्या अशोकचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने नातेवाइकांकडे कसून शोध घेतला. दरम्यान, तो कर्नाटकातील विजापूर येथे येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एस.बी. जाधव यांना ५ जुलै रोजी मिळाली. या माहितीच्या आधारे कासारवडवली पोलिसांच्या एका पथकाने अशोक याला ६ जुलै रोजी कर्नाटकातून अटक केली. खुनी हल्ल्यासाठी वापरलेले हत्यारही त्याच्याकडून जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार आणि निरीक्षक ए. ई. काळदाते आदींच्या पथकाने त्याला जेरबंद केले.
पत्नीवर खुनी हल्ला करून पसार झालेल्या पतीला कर्नाटकातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 11:35 PM
पतीच्या त्रासाला कंटाळून ठाण्यात कामासाठी आलेल्या पत्नी आणि तिच्या मामावर शस्त्राने वार करुन खूनी हल्ला करणाऱ्या अशोक हरिजन या पतीला ठाणे पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
ठळक मुद्देपुन्हा कर्नाटकात येण्यासाठी दिला होता नकारपत्नीच्या मामावरही केला होता चाकूने हल्लाकासारवडवली पोलिसांची कामगिरी