ठाणे : ग्रामविकासात ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे स्थान असून पुरुषांच्या बराेबरीने आता महिलाही अनेक ग्रामपंचायतींचा समर्थपणे कारभार पाहत आहे. आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना सरपंचपदी विराजमान हाेण्याची समान संधी त्यांना मिळू लागली आहे. जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींचा कारभार २६५ महिला सरपंचांच्या हाती आहे. मात्र, बहुतांशी महिला सरपंचांच्या कामकाजात त्यांचे पतिराजा हस्तक्षेप करीत असल्याचे आढळले आहे. मात्र, या हस्तक्षेपाला पायबंद घालणारा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. त्यानुसार महिला सरपंचांच्या पतीराजाला आता ग्रामपंचायतीत ‘नो एण्ट्री’ राहणार आहे.
अबला महिलांना सबळ करण्यासाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत प्रतिनिधित्व दिले आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही उत्तम कारभार करू शकत असल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील या ४३१ ग्रामपंचायतींपैकी ४१३ सरपंचांची निवड झाली आहे. यापैकी सर्वाधिक २६५ महिला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार पाहत आहेत. तर केवळ १४८ पुरुष सरपंच जिल्ह्यात आहेत. या महिलाराज असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मात्र त्यांच्या पतीराजांचाच वरचष्मा आहे. या नवरोबांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ते स्वतःलाच स्वयंघोषित सरपंच म्हणून घेत आहेत. त्यामुळे महिला सरपंचांना त्यांच्या बुद्धिकौशल्याने कारभार करण्याची संधी मिळत नाही. त्यांची फक्त स्वाक्षरी घेऊन पतीच सरपंच म्हणून गावभर टेंभा मिरवत असल्याचे दिसून येत आहे. याला पायबंद घालणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार महिला सरपंचांच्या पतीराजाला ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास पूर्णतः बंदी घातली आहे. पतीराज, नातेवाईक आदींकडून कामात हस्तक्षेप झाल्याचे आढळल्यास सरपंच, उपसरपंच, सदस्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सध्या तेथील विरोधी पक्षाचे सदस्य सक्रिय झाले असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.
--------
१) जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती - ४३१
२) महिलाराज असलेल्या ग्रामपंचायती - २६५
जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंच
* तालुका - महिला - पुरुष - एकूण-
१) अंबरनाथ २२ - ०४ - २६
२) भिवंडी ७४ - ४५ - ११९
३) कल्याण २७ - १४- ४१
४) मुरबाड ७९ - ४४ - १२३
५) शहापूर ६३ - ४१ - १०४
-----
प्रतिक्रिया येणार आहेत.