डोंबिवली : गेली दोन वर्षे पुनर्बांधणीनिमित्त बंद असलेल्या कोपर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने मंगळवारी दुपारी १ वाजता या पुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने ऑनलाईन लोकार्पण होणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पुलामुळे वाहतूककोंडीच्या जाचातून डोंबिवलीकरांची सुटका होणार आहे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच हा पूल सुरू होत असल्याने अखेर गणपती पावला अशी भावना वाहनचालक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
डोंबिवली शहर पूर्व-पश्चिम जोडणारा आणि कमकुवत झालेला कोपर उड्डाणपूल सप्टेंबर २०१९ मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हा पूल पाडून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ठाकुर्ली पुलावरून वाहनांना पूर्व-पश्चिम मार्गस्थ व्हावे लागत आहे. ठाकुर्ली उड्डाणपुलावर वाहनांचा वाढलेला ताण पाहता वाहनचालकांना कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे कोपर उड्डाणपूल कधी सुरू होईल अशी प्रतीक्षा सर्वांनाच होती. कोपर पुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात होते. डांबरीकरण आणि रंगरंगोटीचे काम बाकी होते. आता ते काम मार्गी लागल्याने पूल वाहतुकीसाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
--------------------------------------
१९७९ साली कोपर पुलाची बांधणी करण्यात आली. केडीएमसीच्या अखत्यारीतील हा उड्डाणपूल सुरुवातीला साडेसात मीटर रूंद होता. दरम्यान, पुनर्बांधणी करताना मात्र तो १० मीटर रुंद करण्यात आला आहे. रेल्वेच्या हद्दीतील पुलाची रुंदी मात्र बदलण्यात आलेली नाही. जुना पूल वेड्यावाकड्या वळणांचा होता. नवीन पुलाची रचना बदलण्यात आली आहे. भविष्यात पुलाच्या बाजूला दुचाकी आणि तीनचाकी वाहने जाण्यासाठी स्लीप रोड बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी विशिष्ट जागा सोडण्यात आली आहे.
----------------------------------------
अन्य विकासकामांचेही लोकार्पण
सावित्रीबाई फुले कलामंदिरात हा कोपर उड्डाणपुलाचा ऑनलाईन उदघाटनाचा सोहळा पार पडणार आहे. यावेळी तेजस्विनी बस, शहर दर्शन बससेवा, आय वॉर्ड व महाराष्ट्रनगर येथील नागरी आरोग्य केंद्र, प्राणवायू प्रकल्प, शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, मांडा टिटवाळा येथील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अग्निशमन केंद्र, जैव विविधता उद्यान आदींचेही ऑनलाईन लोकार्पण होणार आहे.
----------------------------------------