प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड लसीकरणाचे दाेन डोस पूर्ण होऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रविवारपासून रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली. पण, रविवारी हा सुट्टीचा वार, त्यातच स्वातंत्र्य दिनाची धामधूम यात फारशी वर्दळ कल्याण रेल्वेस्थानकावर दिसून आली नाही. पण, दाेन डोस घेतलेल्या नागरिकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यावर शिक्का मारून देण्याचे काम केडीएमसीतर्फे आजही सुरू असल्याचे दिसून आले. कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या आणि पडताळणीअंती शिक्का मारून मिळालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसले. यात हुश्श अखेर रेल्वे प्रवासाला परवानगी मिळाली; आता वेळ आणि खर्चही वाचणार, अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त झाली.
सरकारने लोकल प्रवाशाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्यानंतर कल्याण-डोंबिवलीत कोविड डोससाठी लसीकरण केंद्रावर गर्दी उसळणार ही बाब स्पष्ट होती. एकीकडे लसींचा खेळखंडोबा सुरू असताना दुसरीकडे नागरिकांना रेल्वेचा पास मिळणे सुकर व्हावे यासाठी केडीएमसीकडून त्यांच्या परिक्षेत्रातील कल्याण, डोंबिवली, कोपर, टिटवाळा, आंबिवली, शहाड, ठाकुर्ली रेल्वेस्थानकांवर सकाळी सात ते दुपारी तीन आणि दुपारी तीन ते रात्री ११ या दोन सत्रांत प्रतिनिधी नियुक्त करून दाेन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची प्रमाणपत्र तपासण्याकामी कक्ष उभारले आहेत.
११ ऑगस्टपासून सुरू झालेल्या कक्षाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. दिवसभरात ८०० ते १००० नागरिक पास मिळण्यासाठी कागदपत्रे घश्न येत असल्याचे तेथील मनपा कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. रविवारी कल्याण रेल्वेस्थानकाचा आढावा घेता फारशी गर्दी सकाळच्या सत्रात दिसून आली नाही. चार ते पाच नागरिक एका वेळेला कक्षाच्या ठिकाणी रांगेत दिसून आले. दोन डोसचे प्रमाणपत्र आणि आधारकार्ड तपासूनच कर्मचाऱ्यांकडून शिक्के मारून दिले जात आहेत. ही परवानगी केवळ रेल्वे पाससाठी असून तिकिटासाठी नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात येत होते. गोंधळ अथवा वादावादी होऊ नये म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलाचा एक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रेल्वे फलाटांवर जागोजागी पोलिसांची गस्त दिसून आली. टीसींकडूनही प्रवाशांकडे तिकीट अथवा पास आहे का, याची तपासणी सुरू होती.
------------------------------------------------
रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाली हे खूप बरे झाले
रेल्वे पास मिळण्यासाठी केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांवर शिक्कामोर्तब होताच नागरिकांची पावले लागलीच पास काढण्यासाठी तिकीट काउंटरकडे वळत होती. त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा नि:श्वास टाकल्याची भावनाही दिसत होती. संबंधित नागरिकांशी संवाद साधला असता रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाली हे खूप बरे झाले. आता वेळ आणि खर्चही वाचणार, अशी प्रतिक्रिया त्यांच्या वतीने देण्यात आली. कल्याणातील किशोर घाडगे हे कळवा येथे कामाला आहेत. जेव्हापासून कामावर जायला परवानगी मिळाली. तेव्हापासून साधारण दीड वर्षे ते कल्याण-कळवा असा दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. वाहतूककोंडी, त्यात खड्ड्यांचा त्रास यात त्यांना कंबरदुखीचा त्रासही व्हायचा, पण आता त्यांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रताप तांबे हेही दररोज कल्याण-अंबरनाथ दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. पेट्रोलचे दर वाढल्याने रोजचा प्रवास परवडत नव्हता. दरम्यान, आता त्यांना रेल्वे पास मिळाल्याने त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
--------------------------------------------------
आनंद मोरे फोटो