अंबरनाथ : येथील शिवगंगानगर परिसरातील महाविद्यालयाच्या आरक्षित भूखंडावर असलेल्या १५० झोपड्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली आहे. सलग तिसऱ्या दिवशी मोठी कारवाई करून पालिकेने अतिक्रमणा विरोधातली आपली भूमिका सर्वांपुढे आणली आहे.अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असताना अधिकारी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पालिका सभागृहात सर्वच नगरसेवक करीत असतात. मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यापासून अतिक्रमणा विरोधात मोठ्या कारवाईला सुरुवात केली आहे. महामार्गावरील झोपड्यांवर कारवाई झाल्यावर लागलीच आठवडाभरातच शिवाजी चौकातील अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांवर कारवाई केली. ती होत नाही तोच लागलीच गुरुवारी मैदानाच्या आरक्षित भूखंडावरील अनधिकृत महाविद्यालयावर कारवाई केली. तर, शुक्रवारी याच पथकाने शिवगंगानगर येथील आरक्षित भूखंडावरील झोपड्यांवर कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)पालिकेचे आरक्षित भूखंड पालिकेच्या ताब्यात घेण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. येथील अतिक्रमण हटविण्याचे काम करताना कोणताही हस्तक्षेप होत नाही. शहरात अतिक्रमण होणार नाही, यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे.- गणेश देशमुख, मुख्याधिकारी
कॉलेजच्या प्लॉटवरील झोपड्या तोडल्या
By admin | Published: February 01, 2016 1:15 AM