सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या ८१ हजार विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला. गणवेशासाठी मिळणाऱ्या सुमारे चार कोटी ८६ लाखांच्या शासकीय निधीसह जिल्हा परिषदेचे५० लाख असा पाच कोटी ३६ लाखांचा निधी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यांवर जमा करण्यास विरोध होत आहे. हा निधी ग्रामपंचायतींच्या शाळा व्यवस्थापन समित्यांच्या खात्यावर जमा करण्याचा घाट घातला जात आहे. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफरनुसारच निधी मिळावा, यासाठी काही संघटना जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहेत.मागील काही वर्षांपासून ‘डीबीटी’ पद्धतीने पालकांच्या खात्यावर गणवेशाची रक्कम जमा होत आहे. भ्रष्टाचार संपवण्यासाठी ही पद्धत सुरू केली. मात्र, त्यास विरोध केला जात आहे. नवीन अध्यादेशाप्रमाणे राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांच्या दोन गणवेशांसाठी ६०० रुपये बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. याआधी विद्यार्थ्यांच्या दोन गणवेशांसाठी केवळ ४०० रुपये दिले जात असत. परंतु, यंदा त्यात २०० रुपये वाढ होऊन ६०० रुपये मिळणार असल्याचे शिक्षकांना लेखी प्राप्त झाल्याचे बोलले जात आहे.जिल्हा परिषदेच्या सुमारे ८१ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शासनाचे चार कोटी ८६ लाख व जिल्हा परिषदेचे ५० लाख असा तब्बल पाच कोटी ३६ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. या रकमेवर ग्रामपंचायतींच्या सरपंचासह शालेय व्यवस्थापन समितीचे नियंत्रण नसल्यामुळे त्यांचा जीव कासावीस झाला आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी डीबीटीद्वारे जमा होणारी गणवेशाची रक्कम पालकांकडून घरकामासाठी खर्च होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.जिल्हा परिषदेसह शासनाकडून येणारा गणवेश निधी शालेय व्यवस्थापन समितीच्या नावे जमा करण्याचा हट्ट ग्रामपंचायतींकडून होत आहे. या अनुसरून ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांना विचारणा केली असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. मात्र, त्यावर लवकरच तोडगा काढणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.>प्रत्येक तालुक्यात वेगळ्या रंगाचा गणवेश!यंदा जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत दिले जाणार आहे. याआधी केवळ एससी, एसटीच्या विद्यार्थ्यांसह सर्व प्रवर्गांतील विद्यार्थिनींना मोफत गणवेशाचा लाभ मिळाला. यासाठी त्यांच्या बँक खात्यावर ४०० रुपये जमा होत असत. परंतु, यंदा ६०० रुपये विद्यार्थ्यांऐवजी पालकांच्या किंवा आईच्या बँक खात्यात जमा होतील. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, म्हणून ठाणे जिल्हा परिषदेनेदेखील अतिरिक्त सुमारे ५० लाखांची तरतूद केली आहे. यामुळे एससी, एसटी असा भेदभाव न करता सर्वच विद्यार्थ्यांना आता मोफत गणवेशाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय, प्रत्येक तालुक्यातील शाळांच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा रंग वेगवेगळा राहणार आहे. याआधी एकाच रंगाचे गणवेश होते. पण, यंदापासून प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा रंग वेगवेगळा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा रंग तालुकाभर एकच असणार आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या रंगातील गणवेश यंदापासून राहणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी लोकमतला सांगितले. मात्र, शासनाचा निधी अद्याप प्राप्त झालेला नसल्यामुळे यंदा पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जि.प.चे विद्यार्थी गणवेशाविना, ८१ हजार विद्यार्थ्यांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 2:25 AM