ठाणे : स्वप्न कायम मोठी पहावीत. जगात जिथे जिथे जिवित जीव असतील त्या सगळ्यांना, जगातील एक कोटी लोकांना भारतीय शास्त्रीय संगीत ऐकविण्याचे स्वप्न मी पहात आहे. यासाठी दीड लाख लोक एकाचवेळी ऐकतील असे लाईव्ह काॅन्सर्ट करण्याचेही माझे स्वप्न आहे. इंडियन क्लासिकल अँड म्युझिक आर्ट्सद्वारा(आयसीएमए) 50 हजार मुलांना संगित शिकवण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न राहील. अशी स्वप्ने मी पहात आहे. या स्वप्नपूर्तीसाठीच आयसीएमए सुरु करण्यात आली असल्याची माहिती लोकप्रिय गायक महेश काळे यांनी यावेळी येथे दिली.
रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे, "सुर निरागस हो, सांगितिक गप्पां "चे सातवे व अखेरचे पुष्प गुंफताना महेश काळे बोलत होते. महेश काळे यांना माधुरी ताम्हाणे यांनी मुलाखती व्दारे त्यांना बोलते केले. सरस्वती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र दिघे, रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आ. संजय केळकर, सचिव शरद पुरोहित, सुहास जावडेकर, ऍड. सुभाष काळे, अशोक भोईर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. सिस्टीम मध्ये काही चूक दुरुस्ती करायची असेल तर ती प्रथम मी करावी या भावनेने आणि अमेरिकेत शास्त्रीय संगीताचा प्रसार, प्रचाराचे काम करण्याकरिता इंडियन क्लासिकल अँड म्युझिक आर्टस् या संस्थेची स्थापना करण्यात आली. कला हे संस्कृतीचे अविभाज्य भाग आहे. कलेतुन संस्कृतीचे दर्शन घडते. देवळात जाताना प्रथम बाहेर नंदी दिसतो, महिरप दिसते, मग देव, देवळातली आरास, उदबत्ती या सार्याला एक फिलाॅसाॅफिकल अर्थ आहे. गाण्याची अशी एक गोष्ट तयार करायला हवी. भारतीय शास्त्रीय संगीताला प्रतिष्ठा आणायला हवी. कलाकारांची बेअदबी होणार नाही हे पहावे. गाण्याचे तिकिट काढले म्हणजे कलाकृतीचे पैसे नाही मोजत तर अकॅसिसचे पैसे मोजतो आपण. कलाकारांचा विश्वास, मर्जी सांभाळणे गरजेचे आहे तसेच कार्यक्रमाला येणार्यांवर अत्तराची फवारणी व्हावी, अशा वातावरणात गाणे सादर व्हावे, अशाप्रकारे कार्यक्रम करणारे कलाकार निर्माण व्हावेत यासाठी आयसीएमएची स्कॉलरशिप दिली जाते, प्रल्हाद जाधव त्यातील एक आहे. सध्या पाच ते सहा विद्यार्थी आयसीएमएने दत्तक घेतले आहेत. स॔गित कलेतील अशा 50 हजार मुलांना मदत करता आली आणि त्यातुन एक भीमसेन जोशी मिळवता आले तर ते करण्याचा आयसीएमए चा प्रयत्न आहे. आयसीएमए उभारताना एक डाॅलर अमेरिकेत जमा केला तर भारतातील अनेक रुपये होतात यासाठी पहिला डाॅलर मी उभा केला. नंतर अनेक मित्रांनी मदत केली. प्रतिभा आहे पण उपजिवीकेचे साधन नाही म्हणून कला मरु नये यासाठी फंड रेझिंग मधून पाच हजार डाॅलर मित्रांनी उभे केले. माझ्या तीन कार्यक्रमाचा निधीही दिला. कार्यक्रमाचे मानधनही येथे वळविण्यात येते. कुठलीही गोष्ट करताना फिनान्शिअल राॅबिन्सन महत्वाचा असतो असे मत महेश काळे यांनी व्यक्त केले.
टीचर हाच मुलांना घडवत असतो. त्याच्यापेक्षा आईवडील आणि देवही मोठा नाही. वेळ जात नाही म्हणून टीचर शिकवित असतील तर ते प्राॅपर गाणे नाही. त्याचा फोकस नसेल तर पुढची पिढी कशी घडेल ? खतपाणी दर्जाचे नसेल तर बीज कसे सकस असेल ? विद्यार्थी दशेत लोक सगळ्यात जास्त जागरूक असतात. ही नविन उर्जा काहीही होऊ शकते, हे सांगते. वडील गाणारे म्हणून मुलगा गाणारा असे होत नाही. गाणे कोणी करावे हे देव ठरवतो देव गायकाला काही वारसदारांकडे जन्माला घालत नाही. पुढच्या पिढीला बदलत्या काळात प्रोत्साहन कसे द्यायचे ते काम अलिकडच्या पिढीने करायला हवे. मूव्हमेंट घडविण्यासाठी वडीलधार्यांनी प्रयत्न करायला हवेत. शाळेत संगित या विषयावर धडा आहे का ? शाळेत संगित परत शिकवावे म्हणून मोर्चा का नाही काढला जात ? टीव्हीवर शास्त्रीय संगीत आहे का ? फोन, टीव्ही, रेडिओ या माध्यमांवर सकस, अभिजात शास्त्रीय संगीताचा एकतरी वर्ग असावा. यामुळे संगित शिकत नाही म्हणून तरुण पिढीला कसा दोष देता येईल ? यामुळे रिऍलिटी शो ही तरुणांसाठी संधी आहे. छोट्या गावातून कलाकारांचा खजिना सापडल्याचा अनुभव आहे हा. आताची पिढी माझ्या पिढीपेक्षा खुप जास्त छान आहे. त्यांना बरोबर डिरेक्ट कसे करता येईल यासाठी थिंकटॅन्क बांधायची गरज आहे, असे महेश काळे म्हणाले.
गोंदवले येथे असताना कडाक्याच्या थंडीत, डोळ्यावर झोप असताना पहाटे प्रथम काकडा गायलो. अमेरिकेत जाईपर्यंत दर रविवारी काकड आरती, दर गुरुवारी भजन गात होतो. यातूनच अभंग, कीर्तन परंपरेची ओळख झाली. या वातावरणात रमायला लागलो. रमायला लागले की गोष्टी सुचायला लागतात हे सूचने हाच शास्त्रीय संगीताचा गाभा आहे. रोज आपल्या आवडीची गोष्ट करायला मिळणे म्हणजे समृध्दी आहे. गाणे हे आयुष्यातील सुंदर अनुभव आहे. अभिषेकीबुवांनी आपल्या शिष्यांना हा अनुभव दिला. फ्युजन आपल्या विचाराला शब्द देतो तेव्हा आकलन, एक्स्प्रेशन उमटतात. षडजाला सा मिळतो, गाण्याला ताल मिळतो तेव्हा फ्युजन होते. स्वर कोणाच्या मालकीचे नसतात. स्वर भवतालात असतात त्याच्यावर कोणी बाऊन्ड्री टाकू शकत नाही. ज्या भाषेत असेल त्या भाषेतले शिकावे. हसल्यावर, बोलण्यावर जे हेलकावे येतात ते गाणे असते. राग संगीताचे मुर्त स्वरुप हे हिमालयाचे छायाचित्र काढल्यासारखे आहे. फ्युजन, अभंग, सुफी, ठुमरी, ख्याल, ध्रुपद यात शास्त्रीय संगीताचा डीएनए आहे. या धावपळीच्या जमान्यात प्रत्येकाला विश्रांतीची गरज आहे आणि शास्त्रीय संगीता इतकी विश्रांती कुठेही नाही. माझीच वाट अजुनही लांब आहे. वाटेवरील काटे कसे बघायचे इतपत गाण्यातून शिकवितो. आजच्या काळात सोमवार ते गुरुवार 200/300 शिष्यांना रोज सकाळी व्हाटसअप ग्रुपवरुन शिकवितो. माझे गाणे शिष्यांकडून पोहोचवतो आहे. आनंद उपभोगण्याकरिता आनंद वाटण्याचा प्रयत्न कंठातुन करतो आहे, असे महेश काळे यांनी सांगितले. यावेळी महेश काळे यांनी, सुर निरागस हो, विठ्ठल विठ्ठल ही गाणीही सादर केली. महेश काळे यांच्या गप्पा व गाणी ऐकताना सरस्वती सेकंडरी स्कूल क्रिडासंकुल पटांगणातील रसिकांची विराट गर्दी संमोहित झाल्यासारखी वाटली.