शहापूर : किल्ले माहुली गडावर राजमाता जिजाऊ यांचे गरोदरकाळात वास्तव्य होते. याच गडावर शिवबाराजे यांच्यावर गर्भसंस्कार घडले. अशा पवित्र भूमीला वंदन करण्यासाठी राजमाता जिजाऊंच्या माहेरचा थेट वंशज म्हणून मी आलो आणि खऱ्या अर्थाने धन्य झालो, असे प्रतिपादन श्रीमंत शिवाजीराजे जाधव यांनी केले. जनक्र ांती संघटना आयोजित किल्ले माहुली शिवजयंती महोत्सवाला ते उपस्थित होते.माहुली गडाच्या पायथ्याशी शिवजयंती साजरी करण्याची प्रथा जनक्रांती संघटनेने तीन वर्षांपासून सुरू केली आहे. त्याप्रसंगी झालेल्या सोहळ्यामध्ये शिवाजीराजे जाधव बोलत होते. ते म्हणाले की, किल्ले माहुली गडाला शिवगर्भभूमी घोषित करण्याच्या जनक्रांतीच्या जनआंदोलनाला माझाही पाठिंबा असून यासाठी जिजाऊंचा वंशज म्हणून मी पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांना भेटून निवेदन देणार आहे. डॉ. दिलीप धानके यांनी किल्ले माहुलीचा इतिहास पुढे आणून एक जनक्र ांती घडवली आहे. त्यांनी राजमाता जिजाऊ यांचे जीवनचरित्र लिहून तेच खरे जिजाऊंच्या विचारांचे वारसदार असल्याचे दाखवून दिले. आता किल्ले माहुलीचा शिवजन्मोत्सव हा संपूर्ण कोकणच्या भूमीतील ऐतिहासिक वारी झाली आहे आणि हा गड हेच आमचे शिवस्मारक आहे, म्हणून सर्व जातीधर्मांतील शिवप्रेमींनी इथे दरवर्षी नतमस्तक झाले पाहिजे, असे मनोगत जनक्र ांतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप धानके यांनी व्यक्त केले. शासनाने या गडाच्या पायथ्याशी एक शिवसृष्टी उभी करून उद्ध्वस्त होत चाललेल्या किल्ले माहुलीचा विकास करण्याची मागणीही त्यांनी केली. या शिवजयंती सोहळ्यामध्ये शाहिरी पोवाडे तसेच कृतिका धानके व पूर्वा भोईर यांची व्याख्याने झाली. (वार्ताहर)
शिवगर्भभूमीला माथा टेकून मी धन्य झालो
By admin | Published: February 21, 2017 5:34 AM