ठाणो : आपल्या जीवनात आईवडिलांनंतर शिक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मी ठाणे महापालिकेच्या किसननगर शाळेचा विद्यार्थी आहे. या शाळेत मला चांगले शिक्षक मिळाले. राजकीय क्षेत्रातही स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आनंद दिघे साहेबांसारखे गुरुवर्य मिळाल्यामुळेच मी किसननगर शाळेचा विद्यार्थी, मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या पुढे उभा असल्याचे मनोगत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात शिक्षकांसमोर व्यक्त केले.
एम. एच. हायस्कूलच्या सभागृहात ठाणे जिल्हा परिषदेकडून शिक्षकांना शिंदे यांच्या हस्ते जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी शिंदे बोलत होते. आईवडील दोघेही कामावर, नोकरीला असतात. अशा वेळी विद्यार्थी पाच ते सहा तास शाळा, क्लासच्या माध्यमातून शिक्षकांकडून घडवला जात आहे. आईवडिलांनंतर जीवनात शिक्षकांचा वाटा सर्वाधिक आहे. त्यांचा आदर करणे सर्वांचे कर्तव्य असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास उशिरा का होईना, पण केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा बोऱ्हाडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे आणि जिल्हा परिषदेचे सभापती व्यासपाठीवर उपस्थित होते.
कोरोना आणि निवडणूक काळातील शिक्षकांच्या कामाचे कौतुकही शिंदे यांनी केले. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत आपण जवळच्या व्यक्ती, कार्यकर्ते, डॉक्टर, शिक्षक आदी गमावल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिक्षकांकडून आपण मोठ्या अपेक्षा करीत असताना त्यांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची गरज असल्याची जाणीवही शिंदे यांनी यावेळी जिल्हा परिषदेस करून दिली. यावेळी शिंदे यांच्या हस्ते पाच प्राथमिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर कपिल पाटील यांच्या हस्ते माध्यमिक शिक्षकांचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
........