ठाणे : “मी प्रौढ असलो तरी बालनाट्यामध्ये केलेल्या कामांमुळे मी एक उत्कृष्ट कलाकार झालो” असे उदगार ज्येष्ट नाट्यकर्मी दिलीप प्रभावळकर यांनी काढले. बालनाट्यातील अजोड कामगिरीबद्दलचा गंधार गौरव पुरस्कार यंदा दिलीप प्रभावळकर याना जाहीर झाला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना घेतलेल्या मुलाखतीत त्यानी बालनाट्यभूमीचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. नाट्य अभिनेत्री संपदा कुलकर्णी यानी त्यांची मुलाखत घेतली.
ठाण्यातील गंधार कलासंस्थेतर्फे बालरंगभूमीवरील कलाकार, नेपत्थकार, वेषभुषाकार, प्रकाश योजना अशा विविध पुरस्कारांचे वितरण सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता. व्यावसायिक बालनाट्यांसाठी अशा प्रकारचा प्रथमच पुरस्कार देण्यात येत होता. याप्रसंगी ज्येष्ठ नाट्यकर्मी कलाकार दिलीप प्रभावळकर याना या वर्षीच्या " गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिडशेहून अधिक बालकलाकारांनी मराठी चित्रपट गीतांचा आजवरचा इतिहास रंगमंचावर कलाअभिनयाने जिवंत केला. त्याला रसिकांची चांगली दाद मिळाली. सत्कार सोहळ्याला प्रतिभा मतकरी, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, आमदार संजय केळकर, ठामपा सभागृह नेते नरेश मस्के,दिग्दर्शक विजू माने , लीना भागवत, प्रा. प्रदीप ढवळ, अशोक बागवे, कलाकार विजय गोखले, गंधार कलासंस्थेचे संस्थापक प्रा. मंदार टिल्लू आदी मान्यवर उपस्थित होते. मुलाखतीत बोलताना दिलीप प्रभावळकर यानी बालनाट्याचा आपल्या जीवनात मोठा वाटा असल्याचे सांगितले. याच ठिकाणी मला उत्कृष्ट अभिनयाचे धडे मिळाले. बालरंगभूमी हि एक प्रयोगशाळा आहे. येथे कलाकारांमध्ये चागल्या अभिनयाची बीजे रोवली जातात असे मला आढळून आले. बालरंगभूमीवर काम करत असताना कशा प्रकारे आवाज फेकणे, संवाद बोलणे, तसेच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची नस या ठिकाणी सापडली. रत्नाकरींच्या बालनाट्यातून अभिनय करतं असताना बरच काही शिकलो. माझ्या आजवरच्या अभिनयातील प्रवासात बालरंगभूमीचा सर्वात मोठा वाटा असल्याचे दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले. गंधार कलासंस्थेबद्दल ऐकले होते पण, आज प्रत्यक्षात पाहावयास मिळाले असे सांगून उपस्थित बालकलाकारांना सल्ला देताना ते म्हणाले की, उत्कृष्ट नट होण्यासही व्यक्तिमत्व देखणे असणे गरजेचे आहे असे नाही. तुमच्या स्वतःतील पैलू ओळखणे गरजेचे आहे. अभिनय करताना स्वत:मधील शक्ती , गुण आणि अभिनयाच्या मर्यादा पाळणे फार महत्वाचे आहे. बालकलाकारांच्या पालकांना सल्ला देताना प्रभावळकर म्हणाले की, तुमच्या आशा - आकांक्षा मुलांवर लादू नका. त्यांना उमलायला वेळ द्यावा . रियालिटी शो सारख्या शर्यतीपासून दूर ठेवा. मी अनेक प्रकारच्या भूमिका, व्यक्तिरेखा केल्या. मानसिक संतुलन बिघडलेल्या भूमिका केल्या पण, मी भूमिका जगत नाही तर ती फक्त मनापासून तयारी करून करत असतो. त्यामुळेच मला विविध पूरस्कार मिळाले. आज मला गंधार गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.. असेच अनेक कलाकार बालरंगभीतून उदयाला येवो हि सदिच्छा त्यानी व्यक्त केली.