ठाणे: कडक गुरू मिळाल्याशिवाय कडक शिक्षण मिळत नाही. गुरुंनी दणके दिल्यावर चूक कळलीच पाहिजे. मात्र, आज मुलांना मारायचे नाही असा नियम आहे. मला आजची शिक्षण पद्धती पटत नाही असे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी व्यक्त केले.हितवधिर्नी सभा आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय येथे डॉ. अनंत देशमुख यांनी जोशी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्राचा प्रवास उलगडला. माझ्या महाविद्यालयीन काळात दरवर्षी तीन अंकी नाटक होत असे. परंतू ही नाटके आता पाहायला मिळत नाही. नाटकाचा मूळ ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे नाटक आहे. सई परांजपे यांच्यामुळे मला ड्रामा स्कूलला जायचे होते हे सांगताना त्या म्हणाल्या की, हौस म्हणून नाटक करणे वेगळे आणि शास्त्रोक्त पदधतीने नाटक शिकणे वेगळे आहे. म्हणूनच मी नाटक शिकायचे ठरवले आणि स्कॉलरशीप मिळवून ड्रामा स्कूलला गेले. यावेळी त्यांनी बॅरिस्टर हे नाटक कसे मिळाले याचा उलगडा केला. अग्नीपंख या अडीच तासांच्या नाटकात ११ वेळा नऊवारी साडी बदलली. या नाटकाचे १५० प्रयोग केल्याची आठवण त्यांनी सांगितले. प्रेक्षक जेव्हा नाटक पाहायला येतात तेव्हा त्यांना रिअॅलिटी दाखवायची असते. नाटकांतून दरवेळी प्रगल्भता येत असते. त्या प्रगल्भतेचे उदाहरण म्हणजे आत्मकथा हे नाटक हे सांगताना त्या म्हणाल्या की, प्रेक्षकांनी वेगळ््या विषयांवरची नाटके देखील पाहिली पाहिजेत आणि त्यावर चर्चा केली पाहिजे. डोक्याचा ताप घालविण्यासाठी नाटक पाहायला जाऊ नका, नाटक हा करमणूकीचा भाग असला तरी तो नवरसात एन्जॉय करा. आम्ही नाटकाच्या तालमी परफेक्शन होईपर्यंत करतो आणि तेच परफेक्शन प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करतो पण त्याकडे प्रेक्षक जात नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. ज्या नाटकांची खरी परिक्षण केली पाहिजे ते होत नाही. परिक्षणात गोष्ट सांगितली जाते. परिक्षण कसे करावे हे देखील आम्ही ड्रामा स्कूलमध्ये शिकलो असेही त्या म्हणाल्या.