ठाणे : ३० वर्षांपूर्वी लावलेले कोकण मराठी साहित्य परिषदेचे रोपटे ३० वर्षांनंतर आज इतके बहरले आहे ते बघताना मी माझे वय विसरतो. मनात खूप आनंद आहे. कोमसापचे बावनकशी हे वैभव आहे, अशा शब्दांत कोमसापचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कर्णिक यांच्या साहित्यावरील आस्वादात्मक लेखांचे संपादन केलेल्या ‘मधुबन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी ज्येष्ठ साहित्यिक, कवी प्रा. प्रवीण दवणे यांच्या हस्ते मराठी ग्रंथसंग्रहालय येथे पार पडला. सुरुवातीला कर्णिक यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी कवी विनोद पितळे यांनी लिहिलेली कविता त्यांना भेट देण्यात आली.
कार्याध्यक्षा नमिता कीर म्हणाल्या, साहित्यिकाला वय नसते, येणारा प्रत्येक क्षण त्याच्यासाठी नवा असतो. कर्णिक यांची जगण्याकडे बघण्याची दृष्टी सकारात्मक आहे. ते नुसते लिहीत नाही तर नवोदितांना मार्गदर्शन करतात. कर्णिक यांच्या पत्राचे वाचन कवयित्री प्रतिभा सराफ यांनी केले. ठाणे शाखेच्या अध्यक्षा मेघना साने व प्रकाशक विवेक मेहेत्रे यांनीदेखील आपली मनोगते व्यक्त केली.
या वेळी सल्लागार प्रा. प्रदीप ढवळ, कार्यवाह राजेश दाभोळकर उपस्थित होते. दरम्यान, साहित्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कार्यकारिणी मंडळाच्या सदस्य संगीता कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा बोर्डे यांनी केले.