- योगेश बिडवई जळणे, भाजणे, कापणे यामुळे चेहरा विद्रुप होण्याबरोबरच काही वेळा शरीराचा एखादा अवयव पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. अशा वेळी प्लास्टिक सर्जरीमुळे मात करता येते. ती महाग असल्याने चित्रपटातील तारे करतात, असा समज असतो. मात्र सर्वसामान्य माणूसही त्याद्वारे आपल्या व्यंगावर मात करू शकतो. विजेच्या धक्क्यामुळे दानिश खाटीक हा तरूण हाताची बोटे हलवू शकत नव्हता. या सर्जरीमुळे त्याची बोटे पूर्ववत झाली आहेत. १५ जुलैच्या प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त दानिश याने ‘लोकमत’शी साधलेला हा संवाद.तुझ्या डाव्या हाताची बोटे हलत नव्हती, ही दुर्घटना कशी घडली?मी घरातील पाण्याची मोटार सुरू केल्यानंतर काही तांत्रिक कारणाने ती सुरू झाली नाही. म्हणून तिला हात लावल्यानंतर विजेचा जोरदार धक्का बसल्याने मला काहीच कळाले नाही. नंतर मी माझे काम करायला लागलो. मात्र नंतर काही दिवसांनी मला लक्षात आले, मी डाव्या हाताने जड वस्तू उचलू शकत नाही. मी हाताने काम करू शकत नाही. हाताची मूठ वळल्यानंतर मी लवकर बोटे सरळ करू शकत नव्हतो.या दुर्घटनेनंतर तुझी मानसिक स्थिती कशी होती?मी डाव्या हाताने लिहीत असल्याने व त्याच हाताची हालचाल मंदावल्याने मला उजव्या हाताने लिहायची सवय करावी लागली. मात्र त्या हाताने चांगले लिहू शकत नव्हतो. त्यामुळे अभ्यासात अडचण यायला लागली. माझे वडील शेळीपालन करतात. या आजारावर खूप पैसे खर्च होतील, अशी भीती होती. भुसावळ, जळगाव येथे तज्ज्ञांचा अभाव असल्याने डोंबिवलीतील प्लास्टिक सर्जन डॉ. प्रितीश भावसार यांना दाखविले. प्लास्टिक सर्जरीने तुमची बोटे पूर्ववत होऊ शकतात, असे सांगितल्यावर जीवात जीव आला.सर्जरीनंतर तुला कसे वाटते? तुझी पुढची स्वप्ने आता पूर्ण होतील, असे तुला वाटते का?हो, प्लास्टिक सर्जरीनंतर माझ्या बोटांची आता पूर्ववर हालचाल होते. मी पूर्वीप्रमाणे काम करू शकतो. जड वस्तू उचलू शकतो. माझे महाविद्यालय पूर्वीप्रमाणे सुरू आहे. मी आता एफवायबीएला आहे. पूर्वीप्रमाणे मी लिहू शकतो. माझी कामे करू शकतो. प्लास्टिक सर्जरीमुळे मला एकप्रकारे नवे जीवनच मिळाले आहे असा विश्वास दानिशयाने या वेळी व्यक्त केला.प्लास्टिक सर्जरी म्हटल्यानंतर खूप महागडी असेल. प्लास्टिक सर्जरी केवळ मोठमोठे अभिनेते-अभिनेत्री करतात, असे मला वाटत होते. मात्र डॉ. भावसार यांनी सर्व समजावून सांगितले. माफक खर्चात माझे उपचार झाले. माझ्या कुटुंबाला मोठा आर्थिक ताण पडला नाही. याचेही मला समाधान आहे.
प्लास्टिक सर्जरीमुळे मला नवे जीवनच मिळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 11:52 PM