मुंबई - मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय असं ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली. पोलिसांनी आपल्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तसंच लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, त्यामुळे राजीनामा देणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. आता, जयंत पाटील यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीची भूमिका घेतली आहे. तसेच, पोलिस प्याद्याप्रमाणे वागत असून विनयभंगाचा गुन्हा येथे लागूच होत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा माझ्याकडे दिला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या नावाने त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. मी त्यांनी हा राजीनामा मागे घ्यावा, राजीनामा देऊ नये, अशी भूमिका घेतली. मात्र, त्यांनी माझ्याकडे हा राजीनामा दिला असून आता आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे मी राजानामा पत्र घेऊन जाईल, मी शरद पवार यांच्याशी चर्चा करेल आणि त्यावर तेच निर्णय घेतील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
आशिष शेलांरांचा पक्ष येथे उभा राहिल्यानंतर, प्रचार न करताच जितेंद्र आव्हाड निवडून येतील, असे म्हणत जयंत पाटील यांनी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्यावर पलटवार केला आहे. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही कायदेशीर लढाई लढू, असे सांगत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
"पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासांत २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही कलम ३५४, मी या पोलीसी अत्याचाराविरुद्ध लढणार...मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या...उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत", असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे
नेमकं प्रकरण काय?
कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात येताना गर्दीत आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणारी महिला देखील होती. याच कार्यक्रमात विनयभंग झाल्याचा दावा संबंधित महिलेनं केला आहे. आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा आरोप या ४० वर्षीय महिलेनं केला आहे. महिलेनं तातडीनं याची माहिती पोलिसांनी दिली. तर पोलिसांनी महिलेला याबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्यानुसार महिलेनं मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.