ठाणे - राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यामुळे व्यथित होऊन आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आव्हाडांची समजूत काढण्यासाठी ठाणे गाठलं. मात्र आव्हाडांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे यायला हवा होता असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले होते. त्यावर आता आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राहुल नार्वेकर यांच्यापेक्षा मी अनुभवाने मोठा आहे. त्यांच्या एवढंच ज्ञान मला कायद्याचे आहे. मी माझा राजीनामा माझ्या बापाकडे दिलेला आहे. ते ठरवतील. माझ्या राजीनाम्याचा पूर्ण निर्णय शरद पवार यांच्यावर सोपवला आहे. मी त्यांना कळवलं पण आधी मला येऊन भेट असा निरोप मला देण्यात आला आहे. त्यामुळे मी त्यांची भेट घेईन असं त्यांनी सांगितले.
हे संपूर्ण कारस्थान रचलंयमाझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल होणं हे माझ्या मनाला लागलेलं आहे. मी पूर्ण अभ्यास केला असता मला समजलं की, त्या घोळक्यात एक बाई येतेय. ती बाई माझ्या बाजूने येत होती. मी काय बोललो हे सर्व रेकॉर्ड झालं आहे. ३५४ ला काही अटी आहेत पण थेट गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांवर खूप दबाव आहे असं ते सांगतात. एखाद्या बाईला पुढे करून महाभारतासारखं नीच राजकारण कारण खूप वाईट आहे. माझ्याविरोधात हे संपूर्ण कारस्थान रचलंय असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.
मला तडीपार करण्याचा डावपोलिसांनी अशाप्रकारे गुन्हे दाखल करायला नको. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जबरदस्तीनं वाहनात टाकलं तेव्हा हे कलम लागत नाही का? त्याठिकाणी उद्धाटनाला आमच्या नगरसेविका रुपाली गोटे यांनाही धक्काबुक्की झाली आणि खूप घाण कृत्य केले त्याच्यावर पोलीस कारवाई करत नाही. माझ्या नावाने आता खोटे फोन धमकीचे जातं आहेत. माझ्यावर ५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल करायचे आणि तडीपारी काढायची असा डाव आहे. त्यासाठी मी तयारी ठेवली पाहिजे असंही आव्हाडांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"