पंकज रोडेकर / ठाणेनिवडणुकीसाठी पुढाऱ्यांकडून राजकीय धुळवडीत रंगाची जणू उधळण होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या-त्या महापालिका , जिल्हा परिषदांमार्फत मतदानासाठी जनजागृती केली जात असताना, आता सोशल मीडियावरही जरा हटके पद्धतीने ‘यंदा कर्तव्य आहे...!’ अशी अनोखी निमंत्रण पत्रिका पाठवत ‘मतदानाला जायचं हं... बालक, पालकांना आवाहन केले आहे,’ अशी पत्रिका पाठवली जात आहे. फेब्रुवारीत कॉलेजकुमारांकडून त्या महिन्यातील ‘डे’ न विसरता जल्लोषात साजरे केले जातात. त्यात महत्त्वाचा वाटा उचलतो तो सोशल मीडिया. त्यामुळे याच सोशल मीडियाचा वापर करत मतदानाच्या जागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून सर्वच स्तरातून जनजागृती सुरू आहे. सोशल मीडियावर ‘शुभमंगल सावधान’ अशी संकल्पना घेऊन मतदार आणि लोकशाहीची विवाह पत्रिका प्रसारित झाली आहे. यात ‘श्री निवडणूक आयोग प्रसन्न’ असा उल्लेख करत मतदाराला भारतमातेच्या सुपूत्राची उपमा दिली आहे. त्याची रेशीमगाठ लोकशाहीशी बांधण्याचे निश्चित केले आहे, असा उल्लेख आहे. याच पद्धतीने आणखीही वेगवेगळ््या कल्पना लढवत, कार्टुन-संदेशांच्या आधारे मतदानाच्या जागृतीचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)
यंदा मतदानाला जायचं हं...
By admin | Published: February 15, 2017 4:44 AM