कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांना लिपिक टंकलेखक तथा संगणकचालक या पदावर पदोन्नती देण्यासाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, या परीक्षेची सक्ती म्हणजे हा सेवाज्येष्ठता डावलण्याचा प्रकार आहे, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. त्यावर, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष व नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी सेवाज्येष्ठता डावलली जाणार नाही, असे आश्वासन रवींद्रन यांनी दिल्याचे पेणकर म्हणाले.लेखी परीक्षेची सक्ती केल्यामुळे १५ ते २० वर्षे सेवा बजावणाऱ्यांना सेवाज्येष्ठतेपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे न्यायासाठी कर्मचाऱ्यांनी पेणकर यांना साकडे घातले होते. पेणकर यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त दीपक पाटील यांच्याशीही याबाबत चर्चा केली होती. परंतु, निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार आयुक्तांचे असल्याने त्यांच्याशी चर्चा करा, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले होते. यावर, नुकतीच पेणकर यांनी रवींद्रन यांच्याशी चर्चा केली. यावेळी संबंधित परिपत्रकामुळे सेवाज्येष्ठता डावलली जाऊ शकते, हा मुद्दा उपस्थित केला. यावर सेवाज्येष्ठता डावलली जाणार नाही, असे आश्वासन आयुक्तांकडून त्यांना देण्यात आले. दरम्यान, २०१४ मध्ये सेवाज्येष्ठतेसाठी पात्र ठरलेल्या ५७ जणांची लेखी परीक्षा घेऊ नका, अशी विनंतीही पेणकर यांनी केली होती. त्यालाही आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पेणकर यांनी सांगितले. आयुक्तांच्या निर्णयामुळे सेवाज्येष्ठता यादीतील संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
सेवाज्येष्ठता डावलणार नाही
By admin | Published: January 12, 2017 7:11 AM