अंबरनाथ : माझ्या हत्येचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अंबरनाथचे आ. डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली आहे. किणीकर हे लातूरहून अंबरनाथमध्ये परतल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी त्यांची भेट घेतली.
आ. किणीकर यांच्या पुतण्याचे २६ डिसेंबर रोजी लातूरमध्ये लग्न होते. या लग्नात किंवा प्रवासात त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेत हा कट उधळून लावला. गुन्हे शाखेकडून आतापर्यंत अनेकांची चौकशी केली असून, शिवसेनेच्या अंबरनाथमधील दोन बड्या पदाधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
किणीकर हे लग्नसोहळा आटोपून अंबरनाथमध्ये परत येताच पोलिसांनी त्यांची भेट घेतली. कटामुळे कुटुंबीय चिंतेत आहेत. जे माझ्या जिवावर उठले, ज्यांनी माझ्या हत्येचा कट रचला, त्यांना सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया किणीकर यांनी दिली आहे.