ठाणे : संघराज्य (केंद्र) सरकार आयबीपीएसमार्फत भरल्या जाणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या रिक्त पदांच्या जागेसाठीचे परीक्षेचे माध्यम हे राज्यभाषा मराठीत करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने सरकारला केली आहे. महाराष्ट्रात हिंदीत परीक्षा घेतल्यामुळे अनेक मराठी मुलांचे नुकसान होत आहे. यामुळे या परीक्षेत मराठीचा समावेश करावा, असे समितीने या मागणीत म्हटले आहे.
गेल्या वर्षभरापासून समिती यासंदर्भात पाठपुरावा करीत आहे. यापुढे जर निवेदनाद्वारे ऐकणार नसतील, तर मराठी मुलांच्या भविष्यासाठी आम्हाला आंदोलनाला बसावे लागेल, असा इशारा समितीने दिला आहे. संघराज्य (केंद्र) सरकार आयबीपीएस या खाजगी संस्थेमार्फत राष्ट्रीयीकृत बँकेच्या परीक्षा दरवर्षी राबवत असते. सदर परीक्षेत काही हजारो पदे विविध राज्यांच्या शिलकी असलेल्या व नव्याने निर्मिलेल्या पदांचा समावेश करून सूचनापत्रात दिलेल्या संख्येने विविध राज्याराज्यांत भरली जातात. या रिक्त जागा देशभरातून भरल्या जात असतानाही पूर्व आणि मुख्य परीक्षेचे माध्यम हे राज्याच्या भाषा सोडून केवळ इंग्रजी आणि हिंदी असते. देशातील प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक माध्यम हे हिंदी आणि इंग्रजी असते, हा निष्कर्ष चुकीचा आहे. हिंदी भाषेत शिक्षण घेणाºया उत्तरेतील राज्यांतील विद्यार्थ्यांना या माध्यमाचा फायदा होत असून प्रादेशिक भाषिक विद्यार्थ्यांना भेदभावास सामोरे जावे लागत आहे, असे समितीचे प्रतिनिधी शहराध्यक्ष प्रसन्न जंगम यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे.