टौंटन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : केन विलियम्सन आणि रॉस टेलर या अनुभवी खेळाडूंनी न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडने शनिवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले.
जिमी निशॅम आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्तान संघाने शरणागती पत्करली. वर्ल्ड कप स्पर्धेतील शनिवारच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनेअफगाणिस्तान संघाला 172 धावांत गुंडाळले. निशॅमने ( 5/31) पाच विकेट घेत न्यूझीलंडच्या दिग्गज गोलंदाजांच्या पंक्तित स्थान पटकावले. वर्ल्ड कप स्पर्धेत एका सामन्यात पाच विकेट घेणारा तो न्यूझीलंडचा पाचवा गोलंदाज ठरला. यापूर्वी रिचर्ड हॅडली ( वि. श्रीलंका, 1983), शेन बाँड ( वि. ऑस्ट्रेलिया 2003), टीम साऊदी ( वि. इंग्लंड 2015) आणि ट्रेंट बोल्ट ( वि. ऑस्ट्रेलिया 2015) यांनी अशी कामगिरी केली आहे. निशॅमला फर्ग्युसनची तोडीस तोड साथ लाभली. फर्ग्युसनने 4 विकेट घेतल्या.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. सलामीवीर मार्टिन गुप्तील शून्यावर बाद झाला. त्यानंतर कॉलीन मुन्रोही (२२) माघारी परतला. पण कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर या अनुभवी जोडीनं संघाचा विजय निश्चित केला. टेलर ४८ धावांवर बाद झाला, विलियम्सनने नाबाद ७९ धावा केल्या.