ठाणे : पुष्पा भावे यांनी अनेक क्षेत्रांत जे भरीव चिंतनशील योगदान दिले आहे, त्याला तोड नाही. त्यासाठी लागणारी ऊर्जा, धैर्य, मानसिक आणि बौद्धिक तयारी यांचा त्यांनी जो आदर्श घालून ठेवला आहे तो सर्वांसाठी अत्यंत मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन पुष्पाताईंच्या वैचारिक प्रवासाचे साथीदार प्रकाशक रामदास भटकळ यांनी केले. ते म्हणाले, त्या मराठीच्या प्राध्यापिका असूनही त्यांनी आपले क्षेत्र मराठी साहित्यापुरते मर्यादित न ठेवता अनेक क्षेत्रांत प्रत्यक्ष काम केले. अनेक चळवळीत निर्भयतेने प्रत्यक्ष सहभाग घेत आपले वाचनाशी असलेले सख्ख्यही सांभाळत त्यांनी जे अनमोल सामाजिक कार्य केले आहे, ते नेहमीच मार्गदर्शक राहील.
लेखिका नीरजा म्हणाल्या, पुष्पाताई या एक अभ्यासू आणि विद्यार्थी घडवणारी शिक्षिका, साहित्य आणि नाट्यक्षेत्रात परखड भाष्य करणाऱ्या हत्या. प्रत्येक आंदोलनात निर्भयपणे, ठामपणे, संयतपणे बोलणाऱ्या वक्त्या, दुर्गाताई भागवतांनंतर भूमिका घेणाऱ्या लेखिका आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हिरीरिने पुरस्कार करणाऱ्या होत्या. ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते सुभाष वारे यांचेही यावेळी भाषण झाले. अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी भावेंच्या कार्यावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला.