शुभदा सासवडे, सफाळेपश्चिम रेल्वेची सेवा नेहमीच वादाचा विषय बनलेली असतांना आता परेचे आदर्श रेल्वेस्थानक असा बहुमान प्राप्त असलेल्या सफाळे स्थानकातुनही समस्यांची धुसफुस एैकु येत आहे. शौचालय, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या गैर सोयींसह जीआरपीच्याच सुरक्षेचा प्रश्नही एैरणीवर आलेला आहे. फलाटावर पत्रे नसल्याने प्रवाशांना उन्ह-पावसाचा सामना करावा लागत आहे. त्यातच आखुड फलाट असल्याने अनेकदा अपघात होत असून त्यांच्या उंचीचा प्रश्नही प्रवाशांना भेडसावत आहे.या स्थानकामधून परिसरातील एडवण, दातीवरे, कोरे, चटाळे, कपासे, माकने, थाटीम इ. गावातून नोकरी व्यवसाय निमित्ताने हजारो प्रवासी आणि शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. फलाट क्र. २ वरील शेडचे पत्रे काढल्यामुळे प्रवाशांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. उड्डाणपुलाच्या बांधणीकरीता शेडचे पत्रे काढण्यात आले होते. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही ना पुल उभारला गेला की शेडचे पत्रे पुर्ववत बसवण्यात आले. येथील दोन्ही फलाटांची लांबी कमी असल्यामुळे शटल व एक्सप्रेस गाड्यांचे पाच ते सहा डबे फलाटाच्या बाहेरच थांबत आहेत. यामुळे वृद्ध महिला तसेच लहान मुलांचे उतरताना हाल होत आहेत. तर साधारणपणे दिड ते दोन वर्षापुर्वी सुरू झालेल्या उपनगरीय लोकल सेवेनंतरही फलाटांची उंची वाढवली गेली नाही. यामुळे फलाट आणि लोकलच्या दरम्यान अंदाजीत एक ते दिड फुटाचे अंतर असल्याने प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. कित्येक प्रवासी ट्रेन पकडण्याच्या नादात फलाटावर पडून जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दोन्ही फलाटांवरील शौचालयाची अवस्था नरक यातना भोगण्यासारखीच झाली आहे. दुर्गंधीमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रेल्वे स्थानकातील वीज पुरवठा खंडीत झाल्यास एमर्जन्सी इन्व्हर्टर बसविण्यात आले होते. मात्र, कित्येकदा स्थानकातील वीज पुरवठा खंडीत होऊनही इन्व्हर्टरचा वापर होत नसल्याची ओरड प्रवाशांची आहे. प्रवाशांच्या व स्थानकाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून येथील पोलीस कर्मचारी बळ खुपच कमी प्रमाणात आहे. रात्रीच्या सुमारास जी. आर. पी. चा फक्त एकच कर्मचारी संपूर्ण स्थानकाची सुरक्षा करीत आहे. जी.आर.पी च्या कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या खोलीमध्येही अनक सुविधांचा अभाव आहे. रात्रीच्या सुमारास साप, विंचू आदी विषारी प्राणी खोलीत शिरत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेवूनच कर्तव्य बजावावे लागत आहे. सकाळच्या सुमारास पालघर, बोईसर, इ. या ठिकाणी नोकरी निमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सफाळे स्थानकाची अधिक आहे. तसेच स्थानकाच्या पुर्व व पश्चिम भागात रिक्षा, दुचाकी, चारचाकी गाड्यांमुळे वाहतुक कोंडी होत आहे.
आदर्श स्थानकाची झाली दुरवस्था
By admin | Published: April 09, 2016 2:08 AM