ठाणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे ठाण्यातील गणेशभक्तांचा कल वाढत आहे. पर्यावरण जागृती आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत. केवळ शाडूच्या मातीच्या, कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या मूर्ती नव्हे, तर विविध पर्यावरणपूरक मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. यात जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या तरुणांनी चक्क गायीच्या शेणापासून तयार केलेल्या मूर्ती बाजारात आणल्या आहेत. या मूर्तींना पर्यावरणप्रेमींनी पसंती दिल्याचे त्यांनी सांगितले.
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सवाचे आगमन आहे. कोरोनाचे सावट असल्याने भक्तांमध्ये उत्साह असला तरी मोजक्या भक्तांमध्ये साधेपणाने तो साजरा केला जाणार आहे. यंदा मोजक्याच मूर्ती गणेशमूर्तिकारांनी बनविल्या आहेत. यातच पर्यावरणप्रेमींसाठी ठाण्याचे मूर्तिकार नरेश नागपुरे आणि पुण्याचे मूर्तिकार जयेंद्र घोलप यांनी गायीचे शेण वापरून मूर्ती तयार केल्या आहेत. मध्य प्रदेश, नाशिक, नागपूर या ठिकाणी असलेल्या गो शाळेत गायीच्या शेणापासून तयार केलेली पावडर मिळते. या पावडरमध्ये हळद, चंदन, गुलाबपाणी आणि मुलतानीमाती मिसळून या मूर्ती तयार करण्यात आल्या. वरून गेरूचा थर लावण्यात आला असून दागिन्यांसाठी चंदन, हळद आणि नैसर्गिक रंगांचा वापर केला आहे.गायीच्या शेणापासून मूर्ती तयार करण्याची संकल्पना सुचली तेव्हा सुरुवातीला शेणाचे फायदे कोणते ही माहिती मिळवली. गायीच्या शेणामुळे नकारात्मकता निघून जाते तसेच, गायीचे शेण पाण्यात मिसळल्यास त्या शेणामुळे दूषित पाणी स्वच्छ होते, असे नरेश नागपुरे यांनी सांगितले. विसर्जनानंतर उरलेल्या गाळाचा उपयोग नैसर्गिक खत म्हणून करता येईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.मूर्तींचे बुकिंगठाण्यातील २३ गणेशभक्तांनी या मूर्तींचे बुकिंग केले आहे. एक फूट उंचीची ही मूर्ती बनविण्यात आली आहे. कोरोनामुळे अनेक जण बाहेर निघत नाहीत, म्हणून या मूर्ती घरपोच देण्याचीही त्यांनी सोय केली आहे. एक भांडे, तुळशीचे रोपही देण्याचा मानस आहे. या उपक्रमात निखिल पवार, शुभम् कोप्रेकर, मंथन खंडाळे, हृतिक उतेकर यांचाही सहभाग आहे.