ठाणे : रिझर्व्ह बँकेने अचानकपणे उद्योजकांचे चालू खाते गोठवल्यामुळे उद्योगांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने आक्रमक भूमिका घेत, पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांना ट्विट करून चालू खाते म्हणा की ओडी खाते किंवा फॉरेक्स यामध्ये पारदर्शकता असेल तर शिथिलता देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे उद्योजकांना व्यवसाय सुलभतेने करता येईल, असेही असोसिएशनने ट्विटमध्ये म्हटले आहे.
चालू खाते उघडण्यास शिस्त लागावी म्हणून रिझर्व्ह बँकेने ६ ऑगस्ट २०२० रोजी परिपत्रक काढले होते. त्यानुसार ज्या खातेदाराने इतर बँकांकडून कर्ज घेतले आहे त्या उद्योगांचे चालू खाते दुसऱ्या बँकेत उघडण्यात येऊ नयेत, असे निर्देश आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या परिपत्रकाबाबत सर्व बँकांना आधीपासून माहिती असतानादेखील चालू खातेधारकांमध्ये कोणतीही जागृती निर्माण न करता आणि त्यांना विश्वासात न घेता अचानकपणे उद्योजकांची चालू खाती गोठवली आहेत. यामुळे यापुढे उद्योगांनी बँकेचे व्यवहार कसे करायचे, हा जटिल प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक उद्योजकांनी चेक सोडलेले असतात. विविध करांचे दायित्व आहे. काही उद्योजकांची ओव्हर ड्राफ्ट सुविधा नसतानासुद्धा खाते गोठवण्यात आले आहे. एकीकडे बँका क्रेडिट सुविधा घेण्यासाठी उद्योजकांकडे पाठपुरावा करतात, अशा प्रकारे उद्योजकांना अडचणीत न आणता आरबीआयने ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी बँकांना शिस्त लावणे आवश्यक आहे.
आयात - निर्यात करायची म्हणजे फॉरेक्स खाते उघडावे लागते, त्यामुळे परदेशातील ग्राहकांचे पैसे फॉरेक्स खात्यात येतात. कस्टम, जीएसटी, आयकर इत्यादी ठिकाणी हे खाते लिंक केलेले असते. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प होणार आहेत. याबाबत बँकांमध्येच गोंधळाची परिस्थिती असल्याने विनाकारण लघुउद्योजकांना त्रास सहन करावा लागणार आहे. विद्यमान चालू खाते आणि सीसी अथवा ओडी खात्यांसंदर्भात बँकानी या परिपत्रकाच्या तारखेपासून म्हणजे ६ ऑगस्ट २०२० पासून तीन महिन्यांच्या कालावधीत रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनांचे अनुपालन सुनिश्चित करायला हवे होते. परंतु ग्राहकांना आगाऊ सूचना न देता खाते गोठविण्यात येत असल्याने मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख शिशिर जोग यांनी निदर्शनास आणून दिले आहे.