लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : कुळगाव- बदलापूर नगरपालिकेला मालमत्ता करातून कोट्यवधींचा निधी मिळतो. मात्र हा निधी विकासकामांवर खर्च झालेला नसल्याचे सांगून हा निधी गेला कुठे याचा शोध घेण्याचे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले. पालिकेत भाजपची सत्ता आल्यास बदलापूरकरांना मालमत्ता करमुक्त करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
बदलापूर पश्चिमेकडील महालक्ष्मी तलावाच्या नूतनीकरण कामाचे नुकतेच कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ते म्हणाले की, बदलापूर शहरात राहणारे बहुतांश नागरिक मध्यमवर्गीय असून मालमत्ताकरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या नागरिकांना करमुक्त करणे गरजेचे आहे. पालिकेत शिवसेनेची सत्ता होती. मात्र शहरात विकास भाजप नगरसेवकांच्या माध्यमातूनच झाला असल्याच्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने बदलापुरात सर्व रस्ते कॉंक्रिटचे झाले असल्याचे कथोरे यांनी सांगितले. बदलापूरच्या नव्या पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून त्यामुळे लवकरच बदलापुरातील पाणी समस्याही दूर होणार असल्याची माहितीही कथोरे यांनी दिली.
वर्षभरापूर्वी नगरपरिषदेतील नगरसेवकांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. मात्र अजूनही भाजप नगरसेवकांच्या प्रभागात लोकांच्या दृष्टीस पडतील, अशी कामे सुरू असल्याचे राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले. फक्त गटारे, पायवाटा न करता भविष्यात उपयोगी पडतील अशी लोकोपयोगी विकासकामे मंजूर करण्यासाठी ठराव मांडणे, निधी मिळवणे याचे योग्य नियोजन केल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे घोरपडे यांनी स्पष्ट केले. पूर्वी शिवसेनेचा नगरसेवक असताना महालक्ष्मी तलावाची अवस्था डबक्यासारखी होती. आता त्याला खऱ्या अर्थाने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे सांगत घोरपडे यांनी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले. शिवसेनेच्या तुलनेत भाजप नगरसेवकांच्या प्रभागातच उद्यान, तलाव, अभ्यासिका अशी चांगल्या दर्जाची व अधिक विकासकामे झाली असल्याचा दावाही त्यांनी केला.
-------------