कल्याण : डोंबिवलीतील मेट्रोपॉलिटन एक्झिमकेम कंपनीला लागलेल्या आगीनंतर एमआयडीसीतील अतिधोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, या कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यास त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असा पवित्रा कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे (कामा) अध्यक्ष देवेन सोनी यांनी घेतला आहे.आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या वार्तालापामध्ये सोनी यांनी ही माहिती दिली. यावेळी पदाधिकारी नारायण टेकाडे, राजू बैलूर, डॉ. निखिल धूत, बाबाजी चौधरी, श्रीकांत जोशी आदी उपस्थित होते.सोनी म्हणाले, ‘मेट्रोपॉलिटन एक्झिमकेम कंपनीत पुरेसा पाण्याचा साठा व सुरक्षिततेची पुरेशी यंत्रणा होती. त्याच जोरावर कंपनी व्यवस्थापनाने स्वत: आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे आग आवाक्याबाहेर गेल्याने ती भडकली. एमआयडीसीच्या अग्निशमन केंद्रात अवघ्या दोन गाड्या आहेत. त्यापैकी एकच गाडी पाठविली जाते. तर, दुसरी राखीव म्हणून ठेवली जाते. एमआयडीसीतील कारखान्यांची संख्या पाहता किमान तीन गाड्या असल्या पाहिजेत. अग्निशमन दल अकार्यक्षम असल्याची तक्रार ‘कामा’तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे होणाºया तिमाही बैठकीत केली जाणार आहे.’ते पुढे म्हणाले, डोंबिवलीत एकूण ५५० कारखाने आहेत. त्यामानाने एमआयडीसीकडून योग्य प्रकारे सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यामुळेच कारखान्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांकडे होणाºया बैठकीत मांडली जाणार आहे. एमआयडीसीने व महापालिकेने कारखाना व नागरी वस्तीतील अंतर न ठेवता बांधकामास परवानगी दिली. जेथे परवानगी दिलेली नाही, तेथे बेकायदा बांधकामे झाली असून, त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. हा मुद्दाही उपस्थित करण्यात येणार आहे.’गुलाबी रस्त्याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीतील कंपन्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सरकारी यंत्रणांनी ३११ कंपन्यांचे सर्वेक्षण तसेच वर्गवारी केली आहे. कारखानदारांनी ९९ वर्षांच्या लीजवर एमआयडीसीकडून जागा घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या स्थलांतराचा निर्णय घेतल्यास त्याला ‘कामा’चा विरोध असेल. तसेच त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असे सोनी यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाचा मुद्दा गाजणार आहे.कामगारांना दिला जाणार पगारमेट्रोपॉलिटन एक्झिमकेम कंपनीचे आगीत १५० कोटींचे नुकसान झाले आहे. या कंपनीला उत्पादन बंदची नोटीस दिली आहे. सुरक्षा उपाययोजना पूर्ण करूनची उत्पादन सुरू करता येणार आहे. कंपनीतील कामगारांना मालकाकडून पगार दिला जाणार आहे. तसेच ही कंपनी तीन महिन्यांत पुन्हा सुरू करण्याचा मानस कंपनीमालकाने व्यक्त केला आहे. विम्याची रक्कम मिळविण्यासाठी कंपनीला आग लावण्यात आल्याचा संशयही व्यक्त करणे चुकीचे आहे, याकडे सोनी यांनी लक्ष वेधले.
कंपन्या स्थलांतरित केल्यास न्यायालयात; ‘कामा’ संघटनेने दिला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:48 AM