ठाणे - पुढच्या दोन-तीन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होईल. ठाणे शहरही खड्डेमुक्त करायचे आहे. खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी धाडस लागते व आम्ही ते काम केले. मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पंधरा वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला असता, तर पालिकेचे साडेतीन हजार कोटी रुपये वाचून अपघातात बळीही गेले नसते, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. ठाण्यात विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यानिमित्त डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, विविध कामांसाठी मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवीचे पैसे वापरल्याची ओरड होत आहे. उलट, आमचे सरकार आले, त्यानंतर त्यात ११ हजार कोटींनी वाढ झाली आहे.
पांडुरंगाचे दर्शन बंद राहणार नाहीयंदा पाऊस लांबला तरी तो आपला पूर्ण कोटा भरून काढेल, असा विश्वास व्यक्त करताना शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या भरभराठीसाठी पांडुरंगाकडे साकडे घालणार असल्याचे सांगितले. पंढरीच्या वारीसाठी टोल माफ, तसेच जास्त बसगाड्या सोडण्याबरोबरच १५ लाख वारकऱ्यांचा एक लाखांचा विमा उतरविण्यात आला आहे. यंदा पांडुरंगाच्या पूजेदरम्यान मुखदर्शनही सुरूच राहणार आहे, असेही ते म्हणाले.
...तेव्हा तुम्हीच सत्तेत होता!आता चौकशी होणार म्हणून मोर्चा काढणार आहेत; पण त्यावेळी तुम्हीच सत्तेत होता. त्यामुळे ती कामे तुम्हीच केली आहेत. हे लक्षात घ्या. कोरोना काळात ६०० रुपयांची शवपिशवी सहा हजार रुपयांना कुणी विकली, हे सत्य लोकांपुढे यायला हवे, असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला.चांगले काम कराल तर सत्कार, अन्यथा कारवाईज्या शहरांचे रस्ते मोठे, त्या शहरांचा विकास होतो. समृद्धी महामार्ग, घाटकोपर ते घोडबंदर फ्री वे, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग तसेच इतर प्रकल्प राबविले जात आहेत. जे अधिकारी चांगले काम करतील, त्यांचा सत्कार केला जाईल. जे काम करणार नाहीत, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
घोडबंदरच्या पाण्याबाबत लवकरच बैठक एमएमआरडीएच्या देहर्जे प्रकल्पातील पाणी पालघरच्या प्रकल्पांसाठी मंजूर केले. घोडबंदर विभागाला २०० दशलक्ष लिटर पाणी मिळावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. तर वाढीव पाण्याबाबत लवकरच बैठक घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अमृत योजनेतून ३२३ कोटी रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले.