ठाणे : कथा, कादंबरी, ललित अशा विविध प्रकारात लेखन करताना त्यामधले अनुभव विश्व कवितेच्या पातळीवरचे असेल तर ती कलाकृती वाचकांच्या स्मरणात राहते. प्रत्येक अनुभवाला कवितेचे अस्तर असेल तर ते लेखन ग्रेटच म्हणावे लागेल. मानसी ही खऱ्या अर्थाने भाग्यवान कारण तिला आयुष्याचा पेच नीट समजला आहे. तिला मी तिच्या पुढील लेखनप्रवासास शुभेच्छा देतो अशा भावना ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केल्या.
कवयित्री, लेखिका मानसी कुलकर्णी हिच्या पहिल्या 'मौनाची स्पंदने' या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी अरुण म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात मानसीला शुभेच्छा देताना वरील उद्गार काढले. ते म्हणाले, कवितेचा एक विशिष्ट प्रकारचा ग्राफ असतो. सर्वसाधारण विचार सारेच करीत असतात, मात्र त्याच्या पलीकडचा, पुढचा विचार करणे, स्वतःमधला बदल समजून येणे, शब्दांमध्ये रमताना साक्षात्कार होणे ही सर्व जातिवंत कवीची लक्षणे होत. कविता लेखन करताना स्वतःला सूर सापडणे, नेमका शब्द सापडणे म्हणजे अवघड गोष्ट मात्र ही किमया मानसीला उत्तम साधली आहे.यावेळी अरुण म्हात्रे यांनी संग्रहातील 'परतीच्या वाटेवर अजूनही' या ही कविता वाचून त्यातील सौंदर्यस्थळे उलगडून दाखवली. त्यापूर्वी मानसीने आपले मनोगत व्यक्त करताना या संग्रह निर्मितीचे सारे श्रेय आपल्या तिने आपल्या आईला दिले. ती म्हणते " माझी आई ही माझ्या कवितेची पहिली रसिक, वाचक आणि टीकाकार. माझ्यातील कविता शाबूत ठेवण्याचे महत्वाचे काम तिने केले आहे." हे पुस्तक प्रकाशित करणारे व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड आपल्या प्रास्ताविकेत म्हणाले " मानसीच्या शब्दांमध्ये, विषयांमध्ये वैविध्य आहे. तरुणाईची भाषा तिला नेमकी समजली आहे."त्यावेळी व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शक नेर्लेकर, संचालक निलेश गायकवाड, मानसीची आई कवयित्री आरती कुलकर्णी आणि बाबा राघव कुलकर्णी हे उपस्थित होते. या संग्रहातील मानसीच्या कवितांचे वाचन अनेक मंडळींनी उत्स्फूर्तपणे केले हे महत्वाचे. या छोटेखानी, घरगुती स्वरूपाच्या प्रकाशन समारंभास साहित्यक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होते. लेखिका, अनुवादक जयश्री देसाई, मेधा सोमण, साधना जोशी, मेघना साने, दीपा ठाणेकर, मनीषा चव्हाण, साधना ठाकूर, अंजूषा पाटील,पत्रकार प्रज्ञा सोपारकर, वृषाली शिंदे, गीतेश शिंदे, सदानंद राणे, बाळ कांदळकर, राजेश दाभोलकर, आदी मंडळी उपस्थित होती. मानसीच्या 'आकाश कवेत घेताना' हा आत्मकथन पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लवकरच आम्ही प्रकाशित करणार आहोत असे व्यासचे संचालक निलेश गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले. संपूर्ण कार्य्रक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कवयित्री नीता माळी यांनी केले तर आरती कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी महापूर नरेश म्हस्के यांनीही मानसीला शुभेच्छा दिल्या.