ठाणे : कबुतरांना खायला घालत असाल तर सावधान महापालिकेने एक पत्रक काढले असून त्यानुसार कबुतरांना खाद्य दिल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाईल असे स्पष्ट केले आहे. अशा आशयाची पत्रके महापालिकेने शहरातील विविध भागात लावलेली आहे. कबुतरांमुळे कशा पध्दतीने आजार जडू शकतात. हे देखील महापालिकेने सांगितले आहे. परंतु यामुळे पालिका विरुध्द प्राणीमित्र संघटना यांच्यात वाद उफाळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ठाण्यातील प्रत्येक भागात मागील काही वर्षात कबुतरांची संख्या वाढतांना दिसत आहे. इमारतींच्या ठिकाणी कबुतरांची संख्या वाढत असून याठिकाणी मोकळ्या जागेत तसेच खिडकीच्या जवळ कबुतरांना खाद्य टाकले जात आहे. तसेच इतर ठिकाणी देखील मोकळ्या जागेत अशा पध्दतीने कबुतरांना खाद्य दिले जात आहे. परंतु त्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचे कशा पध्दतीने विपरीत परिणाम होऊ शकतात. याची माहिती कदाचित ठाणेकरांना नसल्याचेच दिसत आहे. परंतु याच कबुतरांपासून सावधान राहण्याचे आवाहन करत त्यांना खाद्य पदार्थ टाकण्यास पालिका प्रशासनाने मनाई केली आहे.
या संबंधीचे फलक शहरातील विविध भागात प्रभाग समितींच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत. सध्या हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. कबुतरांना उघड्यावर खाद्य पदार्थ टाकू नका असे आवाहन या फलकांद्वारे करण्यात आलेले असून त्याचबरोबर खाद्य पदार्थ टाकताना आढळून आल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. यापुर्वी कोरोना काळातही पालिका प्रशासनाने अशा प्रकारचे फलक लावले होते. मात्र, त्याच्या अंमलबजावणीबाबत पालिकेकडून ठोस कारवाई होताना दिसून आली नाही. त्यानंतर पालिका प्रशासनाने आता पुन्हा अशाचप्रकारची फलकबाजी सुरु केली आहे.
दरम्यान कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाºया जंतुमुळे हायपर सेंसिटिव्ह न्युमेनियाचा (एचपी) आजार बळवण्याचे प्रमाण पुण्यासह मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फुफ्फुसांशी संबंधित आजार झालेल्यांमध्ये हायपर सेंसिटिव्ह न्युमेनिया हा आजार होण्याचे सर्वाधिक प्रमाण ६० ते ६५ टक्के आहे. त्यामुळेच कबुतरांना उघड्यावर खाद्य पदार्थ टाकू नका असे पालिका प्रशासनाने फलकांद्वारे म्हटले आहे.