डोंबिवली : केडीएमसीकडून फेरीवाला पुनर्वसन धोरणाच्या अंमलबजावणीबाबत वेळकाढूपणा सुरू असताना दुसरीकडे पूर्वेतील फडके मार्गावर एका ठिकाणी महापालिकेच्या लोगोसह लावलेल्या दोन सूचनाफलकांनी मात्र सर्वांचे लक्ष वेधले आहे. बेकायदा फेरीवाले, हातगाडीवाले बसल्यास फोटो काढा, तत्काळ संपर्क साधावा व लेखी तक्रार करावी, असे आवाहन महापालिकेने केल्याचे त्यावर म्हटले आहे. परंतु, हा फलक केडीएमसीने लावला नसल्याचे ‘फ’ प्रभाग अधिकारी अरुण भालेराव हे सांगत असले तरी त्यांचे व नगरसेवक संदीप पुराणिक यांचे मोबाइल क्रमांकही दिले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.केडीएमसीने २०१४ मधील सर्वेक्षणयादीतील फेरीवाल्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे फेरीवाला धोरणाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. त्या दृष्टीने २१ फेब्रुवारीला फेरीवाला धोरण पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आयुक्त गोविंद बोडके यांनी डोंबिवलीतील ‘ग’ आणि ‘फ’ प्रभागांतील पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांचे नियोजन करण्यासाठी विशेष बैठक बोलावली होती. परंतु, त्या दिवशी आयुक्त तहकूब महासभेत व्यस्त होते. त्यामुळे विशेष बैठक होऊ शकली नाही. परिणामी, धोरणाची अंमलबजावणी कृतीअभावी कागदावरच राहिली आहे.दुसरीकडे जेथे धंदा होऊ शकतो, अशाच जागा फेरीवाल्यांसाठी उपलब्ध करून द्या, अशी भूमिका फेरीवाला संघटनांनी घेतली आहे. मात्र, रेल्वेस्थानकापासून १५० मीटर हद्दीत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई आहे. परंतु, या हद्दीबाहेरही फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास विरोध होत आहे. फडके रोडवर लावलेले फलक पाहून त्याची प्रचीती येते.काही महिन्यांपूर्वी याच रस्त्यावरील मुजोर फेरीवाल्यांविरोधात राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांना पिटाळाले होते. त्यावेळी झालेल्या वादात फेरीवाल्यांच्या नेत्यांना तुरुंगवारीही घडली होती. काही फेरीवाल्यांमुळे तो प्रकार घडला असला तरी सरसकट फेरीवाल्यांना १५० मीटर हद्दीबाहेर व्यवसाय करू न देणे, हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्या फलकबाजीवरून उपस्थित केला जात आहे.डोंबिवली कष्टकरी हॉकर्स भाजीविक्रेता संघटनेने या फलकांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. १५० मीटर हद्दीतील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना त्याच्या बाहेरही, अशा प्रकारे फलकबाजी करून अन्याय चालू असेल, तर ते चुकीचे आहे, असे मत संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी व्यक्त केले. जर महापालिका म्हणते, आम्ही फलक लावले नाहीत, तर अशा प्रकारे बेकायदा फलक लावून दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई होणार का, असाही सवाल कांबळे यांनी केला आहे.फलकांबाबत माहीत नाहीआम्ही अशा प्रकारचे फलक लावलेले नाहीत. जर कोणी बेकायदा फलक लावले असतील, तर ते तत्काळ हटवले जातील, असे मत ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण भालेराव यांनी व्यक्त केले.त्यामुळे फलक लावलेफलक लावले आहेत, तेथे अरुंद गल्ली आहे. तेथे फेरीवाले बसत होते. तसेच हातगाड्या लागत असल्याने कोंडी तसेच वादही होत असत. त्यामुळेच तेथील स्थानिक रहिवाशांनी फलक लावले आहेत, असे स्थानिक नगरसेवक संदीप पुराणिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
फेरीवाला बसल्यास फोटो काढा अन् संपर्क साधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:16 AM