- अनिकेत घमंडी, डोंबिवली
भिवंडीत मेट्रो येणार असल्याचे आम्हाला दु:ख नाही, पण डोंबिवलीसह बदलापूरपर्यंतच्या आणि कळवा ते दिव्यापर्यंतच्या २५ लाख रेल्वेप्रवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सापत्न वागणूक दिल्याची खंत वाटते. एमएमआरडीएने तळोजापर्यंत येणारी मेट्रो तातडीने डोंबिवलीसह पुढे न्यावी आणि येथील प्रवाशांना न्याय द्यावा, अन्यथा आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत, अशी भूमिका मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केली.बदलापूर ते ठाणेदरम्यान रेल्वे प्रवासात रोज सरासरी सात प्रवाशांचा अपघात होतो. त्यातील बहुतांशी प्रवाशांचा मृत्यू होतो, ही बाब गंभीर आहे. या मार्गावरील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकार प्रयत्नशील का नाही, असा सवाल त्यांनी केला. आधी महापालिका निवडणुकांच्या वेळी ६ हजार ५०० कोटींचे पॅकेज, त्यानंतर माणकोली पुलाच्या भूमिपूजनाचा उपक्रम आणि आता मेट्रो प्रकरण या एकापाठोपाठच्या घटनांमधून सरकारने येथील नागरिकांवर अन्यायच केला आहे. तो मनसे सहन करणार नाही. त्यासाठी जनआंदोलन केले जाईल, अशी भूमिका उपाध्यक्ष राजेश कदम यांनी मांडली.खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि डोंबिवलीचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे सगळे हातचे सर्व जात असूनही गप्प का बसले आहेत? नागरिकांनी त्यांना यासाठीच निवडून दिले आहे का? आता तरी नागरिकांनी सतर्क व्हावे. वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. तरच यातून काही मार्ग निघणे सोपे होईल.सरकार सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळत आहे. त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवत असल्याची टीका त्यांनी केली. फडणवीस यांनी येथील नागरिकांसाठी मेट्रो प्रकल्पास मंजुरी द्यावी. एमएमआरडीएने सुधारित आराखडा तयार करावा. मूळ आराखड्यात बदल करता येऊ शकतो, त्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली. आधी पालिका निवडणुकीच्या वेळी पॅकेजबाबत जशी फसवणूक झाली, तशाी आता होऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.