एक आमदार फुटला तर पक्ष संपत नाही- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 04:51 AM2019-07-18T04:51:30+5:302019-07-18T04:51:55+5:30
पांडुरंग बरोरा हे सत्तेच्या लालसेपोटी पक्ष सोडून शिवसेनेत गेले. त्यांचा हा निर्णय चुकला आहे.
शेणवा : पांडुरंग बरोरा हे सत्तेच्या लालसेपोटी पक्ष सोडून शिवसेनेत गेले. त्यांचा हा निर्णय चुकला आहे. पण एक आमदार फुटला, तर पक्ष संपत नाही, असे सांगत कार्यकर्त्यांना नव्याने तयार करून येत्या विधानसभेत शहापूरमध्ये राष्ट्रवादीचाच आमदार निवडून आणा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशानंतर डळमळीत झालेल्या राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी आणि पक्षातील गळती रोखण्यासाठी अजित पवार यांनी बुधवारी शहापूर येथे राष्ट्रवादीचा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
छत्रपतींचे नाव घेऊन भाजप- शिवसेनेचे सरकार महाराष्टÑातील तरुणांची माथी भडकावण्याचे काम करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी शहापूर येथे केली. तसेच सरकारमुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. या वेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक, माजी आमदार गोटीराम पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव, आमदार आनंद ठाकूर आदी उपस्थित होते.
>जुन्या पेन्शनसाठी साकडे
किन्हवली : ठाणे जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष विनोद लुटे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांची भेट घेऊ न जुन्या पेन्शनचा मुद्दा त्यांच्यासमोर ठेवला. शासकीय-निमशासकीय सेवेतील राज्यातील जवळपास चार लाख कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जुनी पेन्शन हा विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा २०१९ निवडणूक जाहीरनाम्यात घ्यावा, यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली.